प्रमोद पाटील, प्रतिनिधी पनवेल, 13 फेब्रुवारी : राज्यात मागच्या वर्षी झालेल्या अविश्वसनीय सत्तांतरानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्यात शिवसेनेमध्ये बंड झाल्यावर दोन गट तयार झाले आहेत. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये संघर्ष तसेच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. यातच आता एक वेगळी बातमी समोर आली आहे. ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्याच्या कार्यक्रमात शिंदे गटातील आमदार नाचले. काय आहे संपूर्ण बातमी - पनवेल तालुक्याचे ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्या मुलीच्या लग्नात शिंदे गटाचे आमदार आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते भरत गोगावले हळदीला गाण्यावर थिरकले. दोन्ही गटातील संघर्ष टोकाला गेला असताना, ठाकरेंच्या तालुका अध्यक्षांच्या लग्न सोहळ्यात अगदी बेधुंद होऊन नाचताना दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. भरत गोगावले हे शिंदे गटाचे प्रवक्ते असून महाड विधानसभा संघाचे आमदार आहेत. तर शिंदे गटाने केलेल्या बंडात त्यांचा मुख्य सहभाग होता. त्यात रायगडचे ते शिंदे गटाचे मुख्य नेते असून जिल्ह्यातील तिन्ही आमदार शिंदे गटात गेले. मात्र, पदाधिकारी ठाकरे गटातच राहिले. त्यात ठाकरे गटाच्या तालुका अध्यक्षांकडील कार्यक्रमात जाऊन नाचणे म्हणजे त्यांना आपल्याकडे आकर्षित केले जात आहे का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
पनवेल तालुक्यात ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्या मुलीच्या लग्नात शिंदे गटाचे आमदार आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते भरत गोगावले हळदीला गाण्यावर थिरकले pic.twitter.com/SrzC2kqHvV
— News18Lokmat (@News18lokmat) February 13, 2023
हेही वाचा - ‘…त्यादिवशी राज्यपाल रात्री साडेदहा पर्यंत जागे’, शिवसेनेने सांगितली कोश्यारींची दुखरी आठवण! मागच्या वर्षी शिवसेनेत दोन गट पडल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर राज्यात शिंदे गट आणि भाजपने सरकार स्थापन केले. यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे.