मुंबई, 18 एप्रिल : मागच्या काही दिवसांच्या नाराजीच्या चर्चा फेटाळून लावत अजित पवारांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं ठणकावून सांगितलं आहे. आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. सोबतच त्यांनी संजय राऊत यांनाही फटकारलं. आमचं वकीलपत्र घेऊ नका, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘अजितदादांविषयी अफवा पसरवल्या गेल्या, त्याला पूर्णविराम मिळाला. महाविकासआघाडीच्या ऐक्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. काही राजकीय पक्षांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ते महाविकासआघाडीमध्ये संभ्रम आणि गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कितीही प्रयत्न केला तरी महाविकासआघाडीला तडा जाणार नाही. अजितदादांनी परखड आणि स्पष्टपणे सांगितलं आहे,’ असं संजय राऊत म्हणाले.
‘अजित पवारांनी माझ्यावर टीका केली असेल का नाही, मला माहिती नाही. अजितदादांविषयी बदनामीची मोहिम चालवली गेली. शिवसेनेमध्ये फूट पाडली जात होती, तेव्हा शरद पवारांपासून अजित पवारांनी भूमिका घेतली. तीच भूमिका आम्ही राष्ट्रवादीबाबत घेतली, त्यात चुकीचं काय?’ असं विचारत संजय राऊत यांनी आपण भूमिकेवर ठाम असल्याचं अप्रत्यक्ष सांगितलं. ‘आम्ही महाविकासआघाडीचे चौकीदार आहोत. महाविकासआघाडी राहावी, वाढावी यासाठी आम्ही चौकीदारी करतोय. केंद्रीय तपास यंत्रणांचा काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेवर दबाव आहे. दबाव आणून पक्ष फोडले जात आहेत. हे सत्य आहे, यात लपवण्यासारखं काय आहे? विरोधकांना तुरुंगात टाकलं जातंय. दडपशाही सुरू आहे, याबाबत शरद पवारांनी देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधानांना पत्र लिहिलं, हे अजित पवारांना माहिती आहे,’ असं संजय राऊत म्हणाले. ‘मी महाविकासआघाडीची बाजू मांडतोय. आम्ही महाविकासआघाडीचे चौकीदार आहोत. महाविकासआघाडीचं आम्ही रक्षण करू. महाविकासआघाडीला राज्यात 180-185 जागा मिळतील. लोकसभेच्या 40 जागा मिळतील. देशभरात भाजपच्या 110 जागा कमी होतील,’ असं भाकितही संजय राऊत यांनी वर्तवलं. राऊतांना काय म्हणाले अजितदादा? राष्ट्रवादी फुटण्याबाबत संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यांचा अजित पवारांनी त्यांच्या खास स्टाईलमध्ये समाचार घेतला. महाविकास आघाडीतले काही नेते त्यांच्या पक्षाचं सोडून दुसऱ्या पक्षाचं कशाला बोलतात अशा शब्दात संजय राऊतांना फटकारलंय. तुमच्या पक्षाचं मुखपत्र आहे त्यातून पक्षाबद्दलच लिहा दुसऱ्यांच्या पक्षाबद्दल लिहण्याची गरज नाही असंही अजित पवारांनी सुनावलं. राष्ट्रवादीची भूमिका मांडण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांनी प्रवक्तेपद घेऊ नका असंही अजित पवार म्हणालेत. आमचं वकीलपत्र घेण्याचं काही कारण नसल्याचंही त्यांनी राऊतांना फटकारलंय.

)







