मुंबई 10 नोव्हेंबर : पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात खासदार संजय राऊत यांना अटक केली होती. बुधवारी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. यानंतर संजय राऊत यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली आहे. दरम्यान आता तुरुंगातून बाहेर येताच संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. ‘मला वाटतं की राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीस हेच चालवत आहेत. ते अनुभवी नेते आहेत,’ असं राऊत यावेळी बोलताना म्हणाले. संजय राऊत यांनी यावेळी बोलताना फडणवीस यांच्या निर्णयांचं कौतुक केलं आहे. राऊत म्हणाले, की मी तुरुंगात असताना राज्य सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले. मी त्या निर्णयांचं स्वागत करतो. विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. राज्यातलं सरकार तेच चालवत आहेत आणि त्यांची लवकरच भेट घेणार आहे, असं राऊत यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. ‘माझ्या मनात कोणाबद्दलच..’; उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबतच्या भेटीआधी संजय राऊतांची प्रतिक्रिया राऊत पुढे म्हणाले, की मी तुरुंगात असताना मला जेव्हा जेव्हा वर्तमानपत्र वाचायला मिळायचं तेव्हा मी याबद्दल माहिती घेत होतो. गरीबांना घरं देण्याचा निर्णय आणि म्हाडाला अधिकार देण्याचा निर्णय हे देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय आहेत. आमच्या सरकारने म्हाडाचे अधिकार काढून घेतले होते ही गोष्ट मला फारशी आवडली नव्हती, असंही राऊत यांनी बोलून दाखवलं. कामानिमित्त फडणवीस आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच अमित शाह यांचीही भेट घेणार असल्याचं राऊत यावेळी बोलताना म्हणाले. दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आज संजय राऊत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीपूर्वी राऊत यांनी प्रतिक्रियाही दिली आहे. तीन महिन्यांनंतर मी हातात घड्याळ घातलं आहे. लोकांनी तीन महिन्यांनंतरही भरपूरप्रेम दिलं. माझ्या मनात कोणाबद्दलही काहीच तक्रार नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. राज ठाकरेंनाही प्रत्युत्तर - राऊत म्हणाले, ‘राज ठाकरे यांनी माझ्यावर टिका करताना सांगितले की संजय राऊत यांनी एकांतात स्वतः शी बोलण्याचा सराव करावा. त्यांना मला सांगायचं आहे, की मला ईडीने बेकादेशीर अटक केली. राजकारणात शत्रूच्या बद्दलही आपण त्याने तुरूंगात जावे ही भावना ठेवू नये’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.