मुंबई, 2 एप्रिल: राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aaghadi) विरूद्ध भाजपा (BJP) असा सामना रंगला आहे. वाझे प्रकरण, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. मात्र या सर्वात शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या बेताल वक्तव्यांमुळे राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून गेलं आहे. राज्याचं राजकारण तापलं असताना महाविकास आघाडीचे आधारवड शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती खालावल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी संजय राऊत यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
संजय राऊत यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यांची प्रकृती उत्तम असून ते लवकर घरी परत येतील असं संजय राऊत यांनी भेटीनंतर सांगितलं. रुग्णालयात असूनही त्यांची देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर बारीक नजर असल्याचं सांगण्यास ते विसरले नाहीत.
देशाचे ज्येष्ठ नेते,महाविकास आघाडी सरकारचे आधारवड मा. शरद पवार यांची इस्पितळात जाऊन भेट घेतली. मा.पवार साहेबांची प्रकृती उत्तम असून. लवकरच ते घरी परततील. इस्पितळातील मुक्कामातही देशाच्या व राज्याच्या घडामोडींवर तयांची बारीक नजर आहे हे दिसले.
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 2, 2021
28 मार्च रोजी संध्याकाळी शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या चाचण्या केल्या. यात त्यांना पित्ताशयाचं विकाराचं निदान झालं आहे. त्यामुळे शरद पवार यांना पुन्हा 31 मार्च रोजी रुग्णालयात दाखल करुन शस्त्रक्रिया करण्यात आली.
दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी होणार मोठा खुलासा? 9 जणांची समिती करणार चौकशी
संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही शिवसेनेची (Shivsena) राजकीय मजबुरी असल्याच्या वक्तव्य केलं होतं. तसंच यूपीएचं (UPA) नेतृत्व शरद पवार यांच्याकडे देण्याचा सल्लाही दिला होता. यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेसने नाराजी व्यक्त करत खडेबोल सुनावले होते. तसेच अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे अपघाती गृहमंत्री असल्याचं वक्तव्यामुळे राज्यातील राजकारणाला चांगलाच ऊत आला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्याने राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. भेटीबाबत अमित शाह यांनी काही चर्चा सार्वजनिक करता येत नाही असं वक्तव्य केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra, Sanjay raut