स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी
सांगली, 18 मार्च: महाराष्ट्राच्या लाल मातीतील खेळ म्हणजे कुस्ती होय. नुकताच पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार झाला. आता महिलांचीही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे. सांगलीत 23 आणि 24 मार्चला होणाऱ्या स्पर्धेची जोरदार तयारी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
महिला दिनी महिलांच्या महाराष्ट्र केसरीची घोषणा
महाराष्ट्रातील महिला कुस्तीपटू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखवत आहेत. मात्र, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी मानल्या जाणाऱ्या राज्यात अद्याप महिला कुस्तीपटूंसाठी मोठी स्पर्धा नव्हती. याबाबत दखल घेत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदने पुढाकार घेतला. यंदाच्या महिला दिनी 8 मार्चला पुण्यातून महिलांच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा झाली. त्यानंतर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते यांनी सांगलीत पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी' स्पर्धा व्हावी म्हणून प्रयत्न केले.
सांगलीच्या कुस्तीपटू लागल्या तयारीला
सांगली जिल्ह्यााला पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिला कुस्तीपटूंमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. पहिली महिला महाराष्ट्र केसरीची गदा सांगली जिल्ह्यातच खेचून आणण्यासाठी कुस्तीपटू तयारीला लागल्या आहेत. तर प्रशिक्षक उत्तमराव पाटील मुलींचा कसून सराव घेत आहेत.
आजीबाईंचा नादच खुळा, लेझीमवर असा काही धरला ठेका की सर्वच थक्क! Video
राज्यभरातून येणार कुस्तीपटू
सांगली सारख्या ग्रामीण भागात पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील खरे टॅलेंट समोर येणार आहे. राज्याच्या सर्व जिल्ह्यातून सुमारे 350 ते 400 महिला मल्ल या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सांगलीत येत आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद त्यांची काळजीपूर्वक व्यवस्था करत आहे, अशी माहिती राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Sangli, Sangli news, Sports, Wrestler