स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 9 मार्च: जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सांगलीत महिला दिनानिमित्त 70 वर्षांहून अधिक वयाच्या महिलांनी लेझिमवर ठेका धरला. या वयात चालणे अवघड असताना लेझिम खेळणाऱ्या आजी पाहून सर्वजण आवाक झाले. स्मायली हास्य आणि योगा क्लबच्या ज्येष्ठ महिलांचा हा फिटनेस फंडा चर्चेचा विषय ठरला आहे. लेझीम खेळाला शेकडो वर्षांची परंपरा लेझीम हा महाराष्ट्रातील एक वीर रसाने परिपूर्ण असणारा खेळप्रकार आहे. तशी या खेळाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. पूर्वीच्या काळी राजे महाराजे, सरदार लढाया जिंकून मायदेशी परत आल्यानंतर राज्याच्या सरहद्दीपासून त्यांच्या मिरवणुका, शोभायात्रा काढल्या जात असत. त्यावेळी यांच्या अग्रभागी लेझीम पथक असे. ढोल, ताशे, हलगीच्या निनादात लेझीम पथक आपल्या वेगवेगळ्या पदलालित्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध करत असते. लेझीम हा एक उत्तम व्यायामाचा प्रकारही आहे. त्यामुळे शाळांमध्येही लेझीम शिकवला जातो. तसेच सण, उत्सवातही लेझीम खेळला जातो.
ज्येष्ठ महिलांची लेझीम खेळण्याची इच्छा सांगलीत ज्येष्ठ महिलांचा स्मायली हास्य आणि योगा क्लब आहे. या ठिकाणी रोज ज्येष्ठ महिला एकत्र येत असतात. महिला दिनानिमित्त त्यांनी महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ प्रकार मानला जाणारा लेझीम खेळण्याचा मनोदय व्यक्त केला. वास्तविक ही इच्छा पूर्ण होणे अवघड वाटत होते. कारण या खेळासाठी 70 वर्षे पार केलेले शरीर साथ देईल याची खात्री नव्हती. त्यातच बहुतांश महिलांना गुडघे दुखीचा त्रास आहे. इच्छाशक्तीने अशक्य वाटणारी गोष्ट शक्य अनेक अडचणी असतानाही ज्येष्ठ महिलांची लेझीम खेळण्याची इच्छाशक्ती कायम होती. त्यामुळे अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाली. सांगलीच्या विसावा मंडळाच्या संजय चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महिलांना लेझीमच्या स्टेप शिकवल्या. दहा दिवसांच्या सरावानंतर महिला लेझीम खेळात तरबेज झाल्या. त्यामुळे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नेमिनाथनगर येथील राजमती मैदानावर त्यांनी लेझीमची प्रात्यक्षिके केली. ज्येष्ठ महिलांच्या अनोख्या महिला दिन कार्यक्रमाला उपस्थितांनी दाद दिली. अजबच! नातवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आजोबा बनवतायत अडीच कोटींचा बेट 1 मेला देणार सलामी आता 1 मे या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पुन्हा एकदा सर्व ज्येष्ठ महिला एकत्र योणार आहेत. 10 ग्रुप्स एकत्र येऊन ध्वजाला सलामी देण्याचा संकल्प महिलांनी सोडला आहे. सांगली महापालिकेचे महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी देखील या ज्येष्ठ महिलांना ग्राऊंड आणि इतर साहित्य उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे.