स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 7 मार्च: शेतकऱ्यांना नेहमीच अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका द्राक्षांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, येथील शेतकऱ्यांना वातावरणातील बदलांचा मोठा फटका सहन करावा लागतो. नुकतेच चिंचणी येथे वाऱ्याने स्टे तार तुटून द्राक्षाची एक एकर बाग कोसळली. त्यामुळे शेतकरी विलास धोंडीराम शिंदे यांचे 10 लाखांचे नुकसान झाले आहे. अन् द्राक्षबाग भुईसपाट झाली विलास शिंदे यांची चिंचणी गावालगत माणिक चमन जातीची एक एकर द्राक्षबाग आहे. वातावरण खराब असतानाही त्यांनी यंदा चांगल्या प्रतीची द्राक्षे तयार केली होती. 130 रुपये दराने व्यापार्याने बाग ठरविली होती व व्यापारी दोन दिवसात हा माल काढणार होता. मात्र गेले तीन दिवस वारा सुटत आहे. त्यातच द्राक्षाचे वजन मंडप पेलू शकला नाही. तारा तुटून व स्टे उपसून द्राक्षबाग भुईसपाट झाली. सायंकाळी सहाच्या दरम्यान हा प्रकार घडला.
शेतकऱ्याने हंबरडा फोडला शेतकरी पिकांना पोटच्या पोरांप्रमाणे जोपासत असतो. कोसळलेली द्राक्षबाग बघून शेतकरी विलास शिंदे यांनी हंबरडा फोडला. हाता-तोंडाशी आलेला माल मातीमोल झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहे.
Maharashtra rain : पिकं झाली आडवी, डबडबलेल्या डोळ्याने शेतकऱ्याने घेतले तोंड झोडून, VIDEO
द्राक्ष उत्पादक दुहेरी संकटात सध्या उन्हाळा सुरू झाला असून द्राक्षांचा हंगाम सुरू आहे. मात्र, द्राक्ष उत्पादकांना चांगला दर मिळत नाही. त्यातच वातावरणातील बदलांमुळे द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.