स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी
सांगली, 7 फेब्रुवारी : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या 'व्हॅलेंटाईन डे' चे वेध प्रेमी जोडप्यांना लागले आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीसोबत सेलिब्रेशन करणाऱ्या या दिवसाची सुरूवात ही 'रोझ डे' नं होते. रोझ डे तसंच व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्तानं लाल गुलाबाची मागणी वाढली आहे. येत्या काही दिवसांमध्ये गुलाबाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील गुलाब उत्पादकांना अच्छे दिन आले आहेत.
शेतकऱ्यांची कळी खुलली
मिरज तालुक्यातील सोनी पाटगाव येथील शेतकरी नंदकुमार माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन एकरात गुलाब शेतीची लागवड केली जाते. साधारणतः 5 ते 6 महिन्यांमध्ये गुलाबाचे पीक येते. सोनी पाटगावमधून मिरच्या मार्केट यार्डात गुलाब पाठविला जातो. तिथून गुलाबाची पुणे आणि मुंबईसह गोवा, कर्नाटक आणि दिल्लीमध्ये निर्यात होते. रेल्वे आणि विमानाचा या वाहतूकीसाठी उपयोग केला जातो. सरासरी प्रत्येक महिन्याला एकरी 50 हजार रुपयांचे उत्पादन होते, अशी माहिती माळी यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातील सोनी पाटगाव भागातील वातावरण गुलाबाला पोषक आहे. येथील गुलाबांना चांगली मागणी आहे. बाजारात प्लॅस्टिकच्या फुलाची मागणी वाढली असली तरी याचा दरावर सध्या कुठंही परिणाम झालेला नाही. फुलांची निगा राखण्याबाबत सरासरी आठवड्यातील दोन वेळा औषध फवारणी केली जाते.
जपानी पद्धतीनं सांगली झाली हिरवीगार, 2 वर्षांमध्येच तयार झालं जंगल, Video
कोणत्या फुलांना मागणी?
साधारणतः बाजारात दोन प्रकारच्या गुलाब फुलांची मागणी असते यामध्ये बोरडेक्स जातीचे फुल आणि गिलिटर जातीचे फुल ही दोन फुले या नियमित प्रमाणे उत्पादित केली जातात तर त्यामधील नवीन जात बोरडेक्स मधील ओपन डच या नवीन फुलाला बाजारात जास्त प्रमाणात मागणी वाढत आहे. घाऊक बाजारात तीन ते आठ रुपये प्रतीफुल असा या गुलाबाचा दर आहे.
गेली दोन वर्ष कोरोना महामारीचा फटका फुल उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. त्यानंतर आता शेतकरी पुन्हा उभा राहत आहे. व्हॅलेनटाईन डे ला आणखी काही दिवस आहेत. आगामी काळात गुलाबाच्या फुलांना मागणी आणखी वाढेल. त्यामुळे गुलाबाची विशेष काळजी घेतली जात आहे, असे नंदकुमार माळी यांनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Local18, Rose, Sangli, Valentine week