स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 6 जून: ऑनलाइनच्या जमान्यात विद्यार्थ्यांना मोबाईल आणि टीव्हीचे लागलेले वेड हे घातक ठरू शकते. मोबाईलच्या अति वापरामुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतेवर होणारे गंभीर परिणाम ओळखून सांगली जिल्ह्यातील मोहिते वडगाव गावाने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. दररोज संध्याकाळी दीड तास मोबाईल आणि टीव्ही बंद करण्याचा निर्णय गावकाऱ्यांसह ग्रामपंचायतीने घेतला आहे. गेली वर्षभरापासून अखंडपणे हा उपक्रम आजही सुरू आहे. रोज दीड तास मोबाईल, टीव्ही बंद जिल्ह्यातील मोहिते वडगाव या गावात अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. रोज दीड तास मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवण्याचा अनोखा निर्णय घेण्यात आला आहे. मोबाईलच्या जमान्यात विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी उपक्रम राबविण्यात आला आहे. याचा परिणाम म्हणून गावातील विद्यार्थी नियमित अभ्यास करत असून महिलाही घरच्या कामाबरोबर पुस्तक वाचत आहेत.
महिलांच्या आमसभेत झाला निर्णय कडेगाव तालुक्यातील पश्चिमेस मोहिते वडगाव हे गाव 3 हजार 105 लोकसंख्येचे आहे. या गावातील मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे वळली. याचा परिणाम जिल्हा परिषदेतील शाळेच्या पटसंख्येवर झाला. कोरोना काळातही मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आणि मुलांची शिक्षणाची गोडी कमी होऊ लागली. याचा विचार करण्यासाठी सरपंच विजय मोहिते यांनी 14 ऑगस्ट रोजी महिलांची आमसभा बोलावली. यावेळी महिलांनी मुलांच्या अभ्यासाचा विषय मांडला. मुलांच्या भविष्याचा विचार करून त्यांनी अभ्यास करावा यासाठी रोजचा दीड तास निश्चित करण्यात आला. कुटुंबातील संवादही पुन्हा सुरू अभ्यासाची आठवण करून देण्यासाठी मंदिरावर भोंगाही बसविण्यात आला आहे. रोज सायंकाळी सात वाजता भोंगाही वाजतो. सर्व मुलं ही घरी पोहचतात आणि अभ्यास करतात. त्यांचे पालक सुद्धा आपल्या पाल्यांचा अभ्यास करून घेतात. त्याच बरोबर महिला स्वयंपाक आणि विविध पुस्तक वाचन करतात. मोबाईलमुळे हिरावलेला कुटुंबातील संवादही पुन्हा सुरू झाला आहे. सात ते रात्री साडे आठ वाजेपर्यंत गावातील सर्व टीव्ही बंद असतात. या वेळेत मोबाईलही कोणी वापरत नाही. 3 मुलींच्या शिक्षणासाठी चौथी पास आईनं दाखवलं धाडस, रोजचा संघर्ष पाहून तुम्हीही कराल सलाम, Video गावात 15 क्रांतिकारक मोहित्यांचे वडगाव या गावात 15 क्रांतिकारक होऊन गेले आहेत. स्वातंत्र्य संग्रामात या गावातील लोकांनी मोठी कामगिरी केली आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोहित्यांचे वडगावमध्ये क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला आहे. गावामध्ये प्राथमिक शाळेत शिकणारी 130 तर, माध्यमिक शाळेत शिकणारी 450 मुले आहेत. या मुलांच्या भविष्याचा विचार करून त्यांनी अभ्यास करावा यासाठी रोजचा दीड तास निश्चित करण्यात आला.