प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 5 जून : आपल्या संसासाराठी, मुलासाठी वाट्टेल तो संघर्ष करण्याची महिलांची तयारी असते. आपली शैक्षणिक पार्श्वभूमी, कौटुंबीक अडचणी यावर मात करत या महिला संसाराला हातभार लावतात. सामान्य घरातील या महिलांचा संघर्ष हा असामान्यच असतो. पुण्यातील वनिता रामोशी या 27 वर्षांच्या सुपर मॉम यामधील एक आहेत. चौथीपर्यंत शिक्षण पण.. वनिता यांचं शिक्षण फक्त चौथीपर्यंत झालंय. त्यांचं लग्न लवकर झालं. त्यांना 3 मुली आहेत. संसाराला हातभार लावण्यासाठी त्या सुरूवातीला शेतमजूरी करून घर चालवत असत. या माध्यमातून घर चालवणं अवघड आहे, असं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी रिक्षा चालवण्यास सुरूवात केली. मुलींना चांगलं शिक्षण मिळावं. त्यांना काही कमी पडू नये, या उद्देशानं त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.
’ मी शेतामध्ये मजूरी करत होते. पण, त्या मजूरीमध्ये घरखर्च भागवणं शक्य नव्हतं. माझं शिक्षण कमी आहे. त्यामुळे अन्य नोकरी मिळणे शक्य नाही. रिक्षा चालवणे हा चांगला पर्याय होता. मला माझ्या नवऱ्यानंच रिक्षा चालवण्यास शिकवली. सुरुवातीला रिक्षा चालवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्या अडचणींवर मात करत, लोकांच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करत मी रिक्षा चालवते,’ असं वनिता यांनी सांगितलं. कुटुंबावर आलं संकट, पण ती डगमगली नाही, रिक्षा चालवून सांभाळला संसार! ‘मी शिकले नाही, पण मुलींनी शिकून स्वत:च्या पायावर उभं राहावं अशी माझी इच्छा आहे. मला हौसमौज करता नाही आली, पण त्यांना करायला मिळावी. लोक मला म्हणतात तुम्हाला तीनही मुलीच आहेत. मुलगा पाहिजे होता. म्हातारपणाला कोण सांभाळणार? पण मला असं वाटतं मुले जबाबदारी झटकतात. माझ्या मुली मला सांभाळतील आणि पुढे जाऊन माझं नाव मोठं करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. माझी आई रिक्षा चालवते म्हणून मला शाळेत मुलं चिडवतात. पण, माझ्या आईचा मला अभिमान आहे. मला मोठेपणी पोलीस अधिकारी व्हायचं आहे. माझ्या आईचं नाव मोठं करायचंय, अशी भावना वनिता यांची आठवीत शिकणारी मुलगी सृष्टीनं व्यक्त केलीय.