स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी
सांगली, 25 मे: राज्यात सध्या उष्णतेची मोठी लाट पसरली आहे. सांगली जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशापर्यंत गेला आहे. माणसांना उकाड्याने असह्य होत असताना मुक्या प्राण्यांचेही हाल होत आहेत. वाढत्या उष्णतेमुळं मिरज तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांवर संकट कोसळलंय. उष्णतेमुळं कोंबड्यांचा मृत्यू होत आहे. यावर उपाय म्हणून विष्णू थोरवे यांनी आपल्या शेडमध्ये देशी जुगाड केलंय. त्यामुळं कुक्कुटपालन शेडमधील तापमान नियंत्रणात राहत आहे.
विष्णू थोरवे यांचा देशी जुगाड
अतिउष्णतेमुळे कोंबड्या मृत्यूमुखी पडत आहेत. त्यासाठी कुक्कुटपालन व्यावसायिक विष्णू थोरवे यांनी आपल्या शेडमध्ये अनोखा जुगाड केला आहे. त्यांनी शेडवर उसाचा पाला टाकला आहे. तसेच त्यावर स्प्रिंकलर बसवले आहे. स्प्रिंकलरच्या पाण्याने उसाचा पाला ओला राहतो. त्यामुळे शेडमधील तापमान नियंत्रणात राहते. यासाठी खर्चही कमी येतो. तसेच तापमान नियंत्रणात राहिल्याने कोंबड्यांना उष्णतेचा धोका निर्माण होत नाही, असे थोरवे यांनी सांगितले.
पोल्ट्री व्यावसायिक संकटात
वाढत्या उन्हामुळे दिवसेंदिवस मिरज पूर्व भागातील पोल्ट्री व्यावसायिक अधिक त्रस्त झाले आहेत. पोल्ट्रीमधील कोंबड्यांना अतिउष्णतेने त्रास होत असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी वेगवेगळ्या उपाययोजना करीत आहेत. पोल्ट्रीमध्ये फॅन बसवणे, छतावर उसाचा ओला पाला-पाचोळा टाकणे. तसेच थोडा थंडावा मिळावा म्हणून बारदाण पोती पाण्याने ओली करून शेडवर टाकली जात आहेत. तर काही ठिकाणी शेडवर पाइपने वारंवार पाणी फवारावे लागत आहे. मात्र हा खर्च वाढत असल्याने पोल्ट्री व्यावसायिक मोठ्या अडचणीत आले आहेत.
अतिउष्णतेमुळे वाढले पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण
मिरज पूर्व भागात पोल्ट्री व्यावसायिक मोठ्या संख्येने आहेत. त्यातच कोंबड्यांचे खाद्य महाग झाले आहे. वैद्यकीय उपचार अधिक करावा लागत आहे. कोंबड्या उष्णतेने कमी खाद्य खातात. परिणामी, कोंबड्यांचे वजन कमी भरते. उष्णतेने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. शेडमध्ये फॅन, फॉगर, शेडवर उसाचे पाचट, स्प्रिंकलर आदी उपाययोजना करताना व्यवस्थापन खर्चात मोठ्याप्रमाणावर वाढ होते. अन्य पक्ष्यांप्रमाणे कोंबड्यांना घामग्रंथी नसल्यामुळे त्यांना अतिउष्णता सहन होत नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. यामुळे पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे.
गवंड्याच्या हाताखाली काम करतानाच फोन आला, शैलेश पोलीस झाला, Video
सांगलीत उष्णतेचा पारा चाळीसच्या घरात
सांगलीत तापमानाचा पारा 39 अंश सेल्सिअस आहे. त्यामुळे अतिउष्णतेने पक्ष्यांचे वजन घटत आहे. दिवसभर प्रचंड उन्ह व रात्री उकाडा असे चित्र आहे. सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत प्रचंड कडक उन्ह पडते. तापमानात झालेली वाढ ही प्राणी, पक्षी व शेतातील पिकांना हानिकारक ठरत आहे. दिवसभर पोल्ट्रीमध्ये सतत फॅन लावणे, सतत शेडवर पाणी फवारणी करावी लागत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Sangli, Sangli news, Summer hot