स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 9 मे: अवघ्या विशीत असताना बैलगाडी घेऊन शेतात निघालेल्या तरुणाचे आयुष्य पालटले. बैल उधळला चाऱ्याने भरलेली बैलगाडी उलटल्याने तो गाडी खाली सापडला आणि जीवनाची दिशाच बदलली. बैलगाडी दोन्ही पायांवरून गेल्याने पाय निकामी झाले. आयुष्याला कायमचे अपंगत्व आले. अंथरुणावर खिळून राहण्याची वेळ आली. मात्र, नशिबाला दोष न देता, खचून न जात तो पुन्हा उभा राहिला, संघर्ष केला आणि साहित्य क्षेत्रात त्यानं आपलं नाव अजरामर केलं. सांगलीतील एका खेडेगावातील सचिन वसंत पाटील या तरुणाची ही संघर्षमय कहाणी आहे. बैलगाडी अपघातात गेले दोन्ही पाय सांगली शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्नाळ गावात सचिन वसंत पाटील हा तरुण राहतो. एकेदिवशी पहाटे बैलगाडी घेऊन शेतात जात असताना अचानक बैल उधळला आणि सचिन गाडीखाली अडकला. त्याच्या अंगावर बैलगाडी पडल्याने दोन्ही पाय निकामी झाले आणि कायमचे अपंगत्व आले. सचिन कायमचा अंथरुणाला खिळून राहिला. अपघातानंतर डॉक्टरांनी फारतर दोन वर्षे जगाल असं सांगितलं. हे ऐकून कुटुंबीयांना धक्काच बसला.
सचिन जिद्दीने राहिला उभा सचिनला अपंगत्व आल्याने संपूर्ण कुटूंब अस्वस्थ होते. त्यामुळे ते कुणी सांगेल तो उपाय करत होते. सचिनने मात्र आत्मविश्वास ढळू दिला नाही. कायमचे अपंगत्व आल्याने सचिन उभा राहील अशं कुणालाच वाटत नव्हतं. मात्र, सचिननं जिद्द सोडलेली नव्हती. काठी, कुबडी, वॉकर घेऊन तो चालायचा आणि उभं राहण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या जिद्दीनं त्याच्या आत्मविश्वासाला बळ मिळत होतं आणि काही प्रमाणात तो हालचाल करू लागला. वाचनानं केलं पायावर उभा कायमचं अपंगत्व आल्यानं सचिनला हालचालीसाठी दुसऱ्यांच्या आधाराची गरज होती. मात्र, सचिनची स्वत:च्या पायावर उभी राहण्याची जिद्द कायम होती. त्यासाठी वडिलांनी लावलेली वाचनाची गोडी कामी आली. अंथुरणाला खिळलेल्या सचिननं या काळात वाचन वाढवलं. त्यातून लेखन सुरू झालं. एका कुशीवर पडून शरीराला जखमा होऊ लागल्या. तरीही जे सुचेल, मनात येईल ते तो लिहीत गेला. याच लिखाणाची पुढं पुस्तकं निघू लागली. साताऱ्याचा सचिन परदेशात राहून करतोय ‘हे’ मोठं काम, video पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान गावकथाकार ते लेखक प्रवास सचिनने लिहायला सुरुवात केली. गावगाड्यावरील त्याचं लिखाण अनेकांना आवडू लागलं. गावकथाकार म्हणून तो प्रसिद्ध झाला. लिखाणच जगण्याची प्रेरणा देऊ लागलं. ‘सांगावा’, ‘अवकाळी विळखा’ हे कथा संग्रह लिहिले आणि ते प्रकाशित झाले. सांगावा या पहिल्याच कथेला पारितोषिकही मिळालं. अमरावतीच्या एका मासिकातर्फे आयोजित कथा स्पर्धेसाठी अनेक पुरस्कारांवर मोहर उमटवली. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात कथा शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा ‘अवकाळी विळखा’ हा सचिनचा कथासंग्रह 2016 मध्ये प्रकाशित झाला. या कथासंग्रहातील ‘कष्टाची भाकरी’ ही कथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. तर गावठी गिच्चा हा कथासंग्रह 2020 मध्ये प्रकाशित झाला आहे.