साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर, 09 मे : लांब राहून देखील काही जण आपल्या मातृभूमीशी मनाने जोडलेले असतात. त्यामुळे त्याविषयीचे आपले प्रेम त्यांच्या कृतीतून व्यक्त होत असते. सचिन पुजारी हा त्यांपैकीच एक तरुण. जो सध्या त्याची जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्राबद्दल अभिमान बाळगत परदेशात राहून महाराष्ट्रीयन बांधवांसाठी काम करतोय. त्यासाठी त्याने चक्क स्वीडन या देशात महाराष्ट्र मंडळ देखील स्थापन केले आहे.
सचिन सुभाष पुजारी हा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात असणाऱ्या कुसुर या गावचा तरुण आहे. त्याचे आई-वडील दोघेही सध्या सेवानिवृत्त शिक्षक आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते सर्वजण उंब्रज या ठिकाणी स्थायिक झाले आहेत. कुसूर या गावी सचिन यांच्या कुटुंबाची शेती आहे. तर लहानपणापासूनच एकत्र कुटुंब पद्धतीत वाढल्यामुळे माणसांच्या गर्दीचा लळा सचिनला लागला आहे. त्यातूनच त्याने आपला मोठा मित्र परिवार मिळवला आहे.
सचिनचे प्राथमिक शिक्षण त्याच्या आजोळी माजगाव या ठिकाणी तर माध्यमिक शिक्षण उंब्रज या ठिकाणी झाले आहे. पुढे इंजिनिअरिंगचे शिक्षण बारामती या ठिकाणी पूर्ण करून त्याने इलेक्ट्रॉनिक्स डिजिटल सिस्टीम या विषयात एमटेकची पदवी घेतली आहे. त्यानंतर बंगळूर येथील एका आंतरराष्ट्रीय कंपनीत त्याने 4 वर्ष काम केले. पुढे याच कंपनीत बढती मिळवत तो स्वीडन येथील गोथेनबर्ग या ठिकाणी येऊन काम करू लागला आहे.
कशी सुचली महाराष्ट्र मंडळाची संकल्पना?
भारतातून स्वीडनमध्ये आलेले इतर लोक त्यांचे सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करतात. मात्र या ठिकाणी मराठी सण-उत्सव ही इतक्या प्रमाणावर साजरे होताना दिसत नव्हते. त्यामुळे इथेपण आपल्या मराठी लोकांचा एक समुदाय असावा, जेणे करून आपले मराठी सण उत्सव एकत्रितपणे साजरे करता येतील. त्याच बरोबर यातून इथे राहणाऱ्या किंवा राहायला येणाऱ्या महाराष्ट्रीयन लोकांना घर, नोकरी शोधताना आदी अडी-अडचणीच्या वेळी एकमेकांना मदत करता येईल. त्यामुळेच मी आणि माझ्या मित्रांनी मंडळाची स्थापना करण्याचे ठरवले, असे सचिन पुजारी याने सांगितले.
डोंबिवलीकर लय भारी, तब्बल 40 वाद्यं वाजवतो हा तरुण, विश्वास नसेल तर पाहा हा VIDEO
...आणि मंडळातील सदस्य गेले वाढत
महाराष्ट्रीयन मंडळ स्थापन करताना सुरुवातील गेल्या वर्षी फक्त चार ते पाच लोक होते. मग एक व्हॉटस्ॲप ग्रुप करून त्यामध्ये लोकांना सामील करुन घेतले जाऊ लागले. त्यातूनच मग महाराष्ट्र मंडळाच्या मार्फत गुढी पाडवा हा पहिला सण साजरा करण्याचे ठरवण्यात आले. यावेळी सण साजरा करताना हळूहळू इतर अनेक लोक यामध्ये जोडले गेले. यातून एप्रिल महिन्यात गुढीपाडवा सण साजरा करताना स्वीडन येथील मराठीभाषिक लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. यावरूनच तिथे राहून देखील तिथल्या लोकांच्या मनात असलेल्या देशप्रेमाची प्रचिती येते, असे सचिन पुजारी याने सांगितले.
अधिकृत महाराष्ट्र मंडळ
गुढीपाडव्यानंतर लोकांचा उत्साह बघून आम्ही लगेचच महाराष्ट्र दिन पहिल्यांदाच गोथेनबर्ग, स्वीडन या ठिकाणी साजरा करण्याचे आम्ही ठरवले. त्यामुळे सर्व परवानग्या घेऊन आम्ही 1 मे रोजी भर पावसात देखील मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला, असे सचिन सांगतो. आता महाराष्ट्र मंडळ गोथेनबर्गच्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या असून भविष्यात या मंडळाच्या आधारे महाराष्ट्रीयन लोकांसाठी अनेक कामे करु असे देखील सचिनने स्पष्ट केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.