सांगली, 17 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. आर्थिक फसवणकीचे, तसेच खूनाचेही प्रकार समोर येत आहेत. त्यातच आता सांगली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दूध व्यवसायातील भागीदारीतून निर्माण झालेल्या आर्थिक वादातून एका 25 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - सुरज बाळासाहेब सावंत (वय-25, रा.अहिरवाडी, ता.वाळवा) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. ही धक्कादायक घटना तुजारपूर गावच्या हद्दीत काल गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. अहिरवाडी येथील सुरज सावंत या 25 वर्षीय युवकाचा लोखंडी गज आणि धारदार हत्याराने खून केल्यानंतर हल्लेखोर आरोपी फरारी झाला आहे. दरम्यान, मतदेहाची उत्तरीय तपासणी कराड येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आली. याबाबत किरण वसंत सावंत यांनी पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयीत हल्लेखोर आणि दूध व्यवसायातील भागीदार शरद मच्छिंद्र दुटाळे (रा. अहिरवाडी, ता. वाळवा) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हेही वाचा - लिव्ह इन पार्टनरसोबत कांड, 3 घटना ज्यांनी देशाला हादरवलं! शरद मच्छिंद्र दुटाळे आणि मृत सुरज सावत हे गावातील दूध व्यवसायात भागीदार होते. त्यातील पैशाच्या हिशोबावरून दोघांमध्ये वाद व्हायचा. व्यवसायातील पैसे मिळावेत यासाठी हल्लेखोर शरद हा नेहमी तगादा लावत असायचा. तर दुसरीकडे सुरज मात्र, त्याला दाद देत नव्हता. या रागातूनच शरदने पाळत ठेवून गुरुवारी रात्री सुरज हा तुजारपूर येथील दुध डेअरीमध्ये दूध घालून परत येत असताना त्याला तुजारपूर गावातून फाट्याकडे जात असताना वाटेतच अडवले आणि त्याच्या डोक्यात आणि तोंडावर लोखंडी गजाने व धारदार हत्याराने वार करत त्याला गंभीर जखमी केले. यानंतर सुरजला उपचारासाठी कराड येथे हलविण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी किरण वसंत सावंत यांनी पोलिसात फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.