स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी
सांगली, 28 मार्च: पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी शेतीमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग करत असतात. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात असणारे शेतकरी मोठ्या प्रयत्नांनी द्राक्षांची शेती करतात. काही शेतकरी द्राक्ष शेतीत वेगवेगळे प्रयोगही करत असतात. पलूस तालुक्यातील सातपूर येथील शेतकऱ्याच्या प्रयोगाला जागतिक मान्यता मिळाली आहे. जयकर माने यांनी द्राक्षांचा 'ब्लॅक क्वीन बेरी' नावाचा वाण विकसित केला असून त्याला पेटंटही मिळाले आहे.
वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय
पलूस तालुक्यातील सातपूर येथील शेतकरी जयकर माने यांचा वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय आहे. ते परंपरागत द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत. मात्र, दुष्काळी भागात शेती करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. निसर्गाच्या लहरीपणाचा फटकाही अनेकदा सहन करावा लागला. त्यामुळे आधुनिकतेची जोड देत त्यांनी शेतीत विविध प्रयोग करण्यास सुरुवात केली.
प्रयोगशील शेतकरी जयकर माने
गेल्या 20 वर्षांत माने यांनी सोनाक्का, सुपर सोनाका, माणिकचमण, कृष्णा, सरिता, काजू अशा वाणांच्या द्राक्षांचे उत्पन्न घेतले. या काळात द्राक्ष शेतीचा त्यांनी चांगला अभ्यास केला. काही वर्षे कृषी सेवा केंद्र चालवले. द्राक्ष शेती अलीकडे सोपी राहिली नाही. लहरी निसर्ग, खते औषधे, मजुरी, मशागत, डिझेलचे वाढलेले दर याची तमा न बाळगता त्यांनी जिद्दीने नवीन वाण विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले.
सुरुवातीला वेलीच्या काडीवर प्रयोग
माने यांनी सुरुवातीला द्राक्ष वेलीच्या एका काडीवर प्रयोग केला. जंगली द्राक्षवेली अशा तीन-चार प्रकारच्या वेलीवर वेगवेगळ्या वाणाच्या द्राक्षवेलींचे डोळे भरले. द्राक्षाचा नवीन वाण विकसित करत असताना अनेकांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच मागील अनुभवाचा फायदा झाला. त्यांनी तीन एकरात नवीन वाणाच्या द्राक्षाची लागण केली. नव्या वाणाला ब्लॅक क्वीन बेरी असे नाव दिले.
आंब्यावरील रोगाची वेळीच घ्या काळजी! 'या' पद्धतीनं करा तातडीनं उपाय, Video
दहा वर्षानंतर मिळाले यश
माने यांनी आपल्या द्राक्ष बागेत प्रयोगाला 2012 मध्ये सुरुवात केली होती. सलग दहा वर्षे ते संशोधन करत होते. त्यानंतर त्यांना नवीन जात विकसित करण्यात यश मिळाले. त्यांनी विकसित केलेली जात अत्यंत उच्च प्रतिची असून ही परदेशातील नागरिकांनाही आवडणारी आहे. या संशोधनाची दखल घेत सुरुवातीला स्थानिक शेतकरी, कृषी अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच संशोधकांनीही भेट देत माहिती घेतली.
ब्लॅक क्वीन बेरीला मिळाले पेटंट
केंद्राच्या नॅशनल रिसर्च सेंटर (दिल्ली) च्या तज्ज्ञांनी सलग तीन वर्षे माने यांच्या द्राक्ष बागेची पाहणी केली. डॉ. उपाध्ये, डॉ. देशपांडे यांनी सलग भेटी देऊन 30 ते 40 नमुने घेऊन तपासणी केली. त्यानंतर नॅशनल रिसर्च सेंटरने या वाणाला पेटंट देखील दिले. आता सांगलीतील शेतकऱ्याच्या शेतीतील प्रयोगाची दखल जागतिक पातळीवर घेतली जात आहे.
दुष्काळी भागात फुलली स्ट्रॉबेरीची शेती, पाहा कशी झाली कमाल! Video
कसा आहे ब्लॅक क्वीन बेरी वाण?
जयकर माने यांच्या ब्लॅक क्वीन बेरी या नवीन वाणाच्या द्राक्षाला लांबी आहे. चांगली फुगवण आहे. साल पातळ, अॅसिडचे प्रमाण अत्यल्प असून गोडी आहे. निर्यातीसाठी व स्थानिक बाजारपेठेसाठी ही योग्य जात आहे. मणी कँकिंग, कूज व रोग कमी आहे. वेलीची वाढ चांगली आहे. पाने रूंद आहेत. पानांची जाडी कमी आहे. दोन्ही पानातील व घडाच्या पाकळीत अंतर जास्त आहे. त्यामुळे रोगाला बळी पडत नाही, असे माने यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Local18, Sangli, Sangli news, Success story