स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 12 एप्रिल: प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द व चिकाटीच्या जोरावर आकाशालाही गवसणी घालण्याचे स्वप्न पाहणाऱ्या डोळस माणसांच्या यशोगाथा अनेक आहेत. मात्र, जन्मतः अंध असूनही 30 जातिवंत खिलार गाई जोपासत सांगलीचा तरुण लाखोंची कमाई करत आहे. आटपाडी तालुक्यातील शेटफळेच्या ओंकार गायकवाड या तरुणाचं लख्ख यश डोळसांनाही मागे सारत आहे. शेतकरी कुटुंबातील ओंकार जन्मत: अंध ओंकार हा शेतकरी कुटुंबातील तरुण आहे. जन्मताच अंध असला तरी त्याचे आयुष्यात काहीतरी मोठे बनण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी शिक्षण घेऊन एखाद्या चांगल्या क्षेत्रात काम करण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र, दिव्यंगत्वामुळे नोकरी मिळवणे आणि ती करणे अवघड होते. त्यासाठी त्याने नोकरीच्या शोधात न जाता वडिलोपार्जित व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
वडिलोपार्जित गोपालनाला सुरुवात ओंकारच्या कुटुंबात अनेक पिढ्यांपासून देशी खिलार गाईचे संगोपन केले जाते. वडील शासकीय सेवेत असताना त्यांनी देशी खिलार गाईचे पालन पोषण केले होते. आता ओंकारने अभ्यासाअंती गाईंचा प्रशस्त गोठा तयार केला आहे. त्याच्याकडे 30 जातिवंत देशी खिलार गाई आहेत. सकाळी पहाटे चार वाजल्यापासून गाईंचा दिनक्रम सुरू होतो. त्यामध्ये शेण काढणं, गोमूत्र एकत्रीकरण करणं ही कामे ओंकार स्वत: करतो. महाराष्ट्रात पुन्हा गायीचं मृत्यूकांड, चाऱ्याअभावी 12 गायींनी सोडला जीव लाखोंच्या कमाईचा मार्ग ओंकार देशी गाईंच्या शेणापासून गोवऱ्या तयार करतो. तसेच देशी गाईंच्या गोमुत्रालाही मागणी आहे. त्यामुळे गोवरी आणि गोमुत्राची विक्री करून त्याला मोठा नफा मिळत आहे. या कामात त्याला त्याच्या कुटुंबीयांचीही मदत मिळत आहे. गोमुत्रावर प्रक्रिया करून त्याचा अर्क तयार करण्याची ओंकारची धडपड आहे. त्याला योग्य प्रशिक्षण आणि साधनसामुग्री मिळत नसल्याने हा प्रकल्प अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही. मात्र, लवकरच प्रयत्न करून गोमुत्रापासून अर्क तयार करणार असल्याचे ओंकार सांगतो.