पुणे, 29 मे : रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर टीका केली आहे. शेजाऱ्याच्या घरात जरी पाळणा हलला तरी पेढे वाटायचे, अशा शब्दांमध्ये सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहेत. राज्यात गेल्या काही वर्षांपासून बैलगाडा शर्यंतीवर बंदी होती. पण सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावरुन आता श्रेयवाद सुरु झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या प्रयत्नामुळे बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने परवानी दिली, असा दावा केला होता. आता त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या प्रयत्नांमुळे बैलगाडा शर्यतवरील निर्बंध हटले, असा दावा केला आहे.
"भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या सहकार्यांनी घेतलेली आहे. शेजाऱ्याच्या घरात जरी पाळणा हलला तरी पेढे वाटायचे, असा राष्ट्रवादी पक्ष आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने 2014 मध्ये बंदी आणली होती. ती बंदी उठवण्याचा निर्णय माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घेतला होता. तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तसं विधेयक आणलं होतं आणि बैलगाडा शर्यतीवरचे निर्बंध उठविण्याचा निर्णय घेतला होता. सर्वोच्च न्यायायलात महेश लांडगे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या समितीने दिलेला रिपोर्ट ग्राह्य धरला. त्यामुळे शर्यतं बंदीवरील निर्बंध उठले", असं सदाभाऊ खोत म्हणाले.
(नाराज मुस्लिम कार्यकर्त्यांनी अडवला ताफा, सुप्रिया सुळेंनी गाडीत बसवून नेलं कार्यक्रमाला, VIDEO)
"आपल्याकडे ऊसाला लागला कोल्हा, अशी म्हण आहे. आयता ऊस लागला की त्याठिकाणी कोल्हा जातो. मला त्याबाबत जास्त बोलायचं नाही. पण बैलगाडा शर्यतीवर कोणी बंदी आणली होती हे त्यांनी स्पष्ट करावं", अशी टीका सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली.
दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या निवडणुकीवरुन माजी खासदार संभाजीराजे आणि शिवसेना यांच्यात जो राजकीय तणाव निर्माण झाला होता त्यावर प्रतिक्रिया दिली. "साताऱ्याची आणि कोल्हापूरच्या गादीचा आम्ही सन्मान आणि आदर करतो. शिवाजी महाराजांच्या नावाने स्थापन झालेल्या शिवसेनेने छत्रपती घराण्याच्या वंशजांचा अपमान केला. याचं महाराष्ट्राच्या जनतेला दु:ख आहे", अशी प्रतिक्रिया खोत यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: NCP, Sadabhau khot