मुंबई, 3 डिसेंबर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतीच काही दिवसांपूर्वी कोरोनावर मात केली. त्यानंतर राज ठाकरे आता पुन्हा कामाला लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील 'शिवतीर्थ' या नव्या निवासस्थानी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षांतर्गत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे राज्यातील आगामी महापालिका निवडणुकींच्या (Municipal Election 2022) पार्श्वभूमीवर राज ठाकरे महाराष्ट्र दौरा (Maharashtra Tour) करणार आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला 6 डिसेंबरपासून सुरुवात होईल. राज ठाकरे 6 डिसेंबरला पुण्यात जाणार आहेत. तिथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर 14 डिसेंबरपासून राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सुरु होणार आहे. ते 14 तारखेला औरंगाबादला दाखल होतील. त्यानंतर 16 डिसेंबरला पुण्यात पुन्हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्षांतर्गत विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.
हेही वाचा : "किल्ले रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरवू देणार नाही"
विशेष म्हणजे राज ठाकरे अयोध्येचा देखील दौरा करणार आहेत. पण त्यासाठी अद्याप तारीख ठरलेली नाही. तसेच राज्यातील सहा विविध भागांमध्ये राज ठाकरे दौरा करणार आहेत, असंदेखील बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.
हेही वाचा : थंडीचा कहर! थंडीत गारठून शिर्डीत दोघांचा मृत्यू, शेकडो शेळ्या दगावल्या
"राज्यातील महापालिका, नगरपंचायत किंवा नगर परिषदेच्या निवडणुका असो या निवडणुकींविषयी बैठकीत चर्चा झाली. राज ठाकरे यांचा दौरा कधीपासून सुरुवात करायची या विषयावर चर्चा झाली. पुण्यात 6 डिसेंबरला एक छोटी बैठक होणार आहे. त्यानंतर 14 डिसेंबरला औरंगाबादमध्ये कोविडचे नियम पाळून काही पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक सकाळी 10 वाजता ठेवली आहे. त्यानंतर पुण्यात 16 डिसेंबरला पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नेते, निवडून आले माजी नगरसेवक तसेच आताचे नगरसेवक यांची सगळ्यांची बैठक आहे. आता दोन बैठकांची तारीख ठरलेली आहे. राज ठाकरे सहा राज्यातील सहा विविध ठिकाणी बैठका घेणार आहेत. आता दोन ठिकाणीच्या तारखा ठरल्या आहेत. त्यानंतर राज ठाकरे कोकणात जातील. पण त्या दौऱ्याची तारीख अद्याप ठरलेली नाही", असं बाळा नांदगावकरांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.