मुंबई, 16 ऑक्टोबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य आणि देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मार्मिकपणे भाष्य केलं आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलं आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी राज ठाकरे यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही निवडणूक बिनविरोध निवडून देण्याची विनंती केली. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी आज फडणवीसांना पत्र पाठवलं. या सगळ्या घडामोडी ताज्या असताना आज संध्याकाळी राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर रोखठोक भूमिका मांडली. राज्य आणि देशात सध्या फक्त ओरबाडणं सुरुय, अशी टीका राज ठाकरे यांनी यावेळी केली. पण आपण भाजपला टोला लगावला नाही, असंही त्यांनी लगेच स्पष्ट केलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'हर हर महादेव' या चित्रपटात आवाज दिलाय. शिवरायांची छत्रपती शिवाजी महाराज होण्याची गोष्ट मी सांगतोय, असे बोल राज ठाकरेंचे आहेत. हर हर महादेव हा चित्रपट एकाच दिवशी मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने राज ठाकरे यांच्यासोबत संवाद साधत अभिनेता सुबोध भावे यांनी मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं.
"मला शिवछत्रपतींची सर्वात आवडणारी लाईन मी एकदा भाषणात सांगितली होती. ज्या क्षेत्रात मी आहे, त्या संपूर्ण क्षेत्राची बजबज झालेली आहे. माझा विचार हा छत्रपतींनी दिलेल्या संदेशावर महाराष्ट्र घडावा असा आहे. त्यातील एक लाईन आवडते. ती लाईन मला भिंतीवर लावणार आहे. कारभार ऐसे करणे की रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लागणे. जो माणूस रयतेचा इतका विचार करतो, मला असं वाटतं की, तो त्यावेळचा संदर्भ असला तरी त्याकडे बघताना काम करणं, महाराष्ट्र असू दे किंवा देशातलं असूदे, सगळीकडे ओरबाडणं सुरु आहे. मागचापुढचा कशाचाही विचार न करता मला नगरसेवक, आमदार, खासदार व्हायचंय, का व्हायचंय? उद्देश काय? ओरबाडायचं आहे. अर्थात सगळ्यांचा तोच नसतो पण बहुसंख्य चित्र तुम्हाला दिसतं. नुसते ओरबाडायला आले आहेत. ते ओरबाडणं कुठेतरी थांबलं पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे", असं राज ठाकरे म्हणाले.
('मी आवाज दिलेल्या पहिल्या फिल्मवर बंदी आलेली', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?)
"निवडणुकीसाठी पैसे लागतात का? हो लागतात. पक्ष चालवायला पैसे लागतात. पण लागून लागून किती लागतात? पण सगळ्या बाजूने ओरबाडणं जे सुरु आहे, तरसांच्या हातात एखादा हत्ती सापडावा तशी राज्याची परिस्थिती आहे. आता लगेच हे सुरु होतील. भारतीय जनता पक्षाला टोला लगावलेला दिसतोय. यांना काही उद्योगच नाही. आता मी काय करु? कधी हे असतात तर कधी ते असतात. इतक्या कमी काळात हे बदलतात मी काय करणार? हे काही कुणाला टोला लगावणं वगैरे नाही. पण सध्याची राजकीय परिस्थिती आपण समजून घ्यायला पाहिजे. प्रत्येकवेळेला नेताच असतो असं नाही. पण खाली जे काही सुरु असतं ते भीषण आणि गंभीर असतं. आपण प्रत्यकाने आपापल्या गोष्टी तपासून घेतल्या पाहिजेत", असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Raj Thackeray