मुंबई, 26 फेब्रुवारी: महाविकास आघाडीतील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वत: राठोडांना सक्त ताकीद दिल्याची माहिती समोर येत आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येत शक्तिप्रदर्शनही केलं. दरम्यान 'मी निर्णय घेण्याआधी तू निर्णय घे' अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांना बजावले असल्याचे मीडिया अहवालात नमुद करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या इशाऱ्यामुळे संजय राठोडांबद्दल संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य खरं होणार की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. झी न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे.
वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण प्रकाशझोतात आल्यापासून करत आहेत. आता राठोडांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनानंतर ही मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी वनमंत्री संजय राठोडांचा राजीनामा मुख्यमंत्री घेणार का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राठोडांवर राजीनाम्यासाठी दबाव वाढू लागल्याचंही चिन्ह आहे.
(हे वाचा-आपला तो बाब्या, पूजा चव्हाणसह प्रलंबित प्रकरणांवरुन भाजपचा गृहमंत्र्यांवर निशाणा)
पोहरादेवी याठिकाणी झालेल्या गर्दीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्याचे मीडिया अहवालात नमुद करण्यात आले आहे. त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी संजय राऊत यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती की, आपल्या माणसाने नियम आणि कायदे मोडले तरी मुख्यमंत्री सोडणार नाहीत, योग्य कारवाई होईल. त्यानुसार आता संजय राठोडांवर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. पोहरादेवी याठिकाणी संजय राठोड यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनाबाबत शरद पवार यांनी देखील नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते आहे. परिणामी राठोडांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे.