Home /News /mumbai /

'आपला तो बाब्या', चौकस नव्हे चौकशीकार गृहमंत्री, प्रलंबित प्रकरणांवरुन भाजपचा निशाणा

'आपला तो बाब्या', चौकस नव्हे चौकशीकार गृहमंत्री, प्रलंबित प्रकरणांवरुन भाजपचा निशाणा

राज्यात काही झालं तरी चौकशी करू हे जणू गृहमंत्र्यांचे ब्रीदवाक्य झालं आहे, महाराष्ट्राला खरं तर चौकस गृहमंत्री अपेक्षित होते, मात्र वास्तावात ‘चौकशीकार’ गृहमंत्री लाभले, असं भाजपनं म्हटलं आहे.

    मुंबई 26 फेब्रुवारी : भाजपनं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन महाविकासआघाडी सरकारला आणि संजय राठोड (Sanjay Rathod) यांना कात्रीत धरलं आहे. अशात आता भाजपनं आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन अनेक ट्वीट शेअर करत धनंजय मुंडे(Dhananjay Munde), , जितेंद्र आव्हाड, सिरम इनस्टिट्यूटमधील आग अशा अनेक प्रकरणांची चौकशी विलंबित असल्याचं म्हणत गृहमंत्री अनिल देशमुखांवर (Anil Deshmukh) निशाणा साधला आहे. राज्यात काही झालं तरी चौकशी करू हे जणू गृहमंत्र्यांचे ब्रीदवाक्य झालं आहे, महाराष्ट्राला खरं तर चौकस गृहमंत्री अपेक्षित होते, मात्र वास्तावात ‘चौकशीकार’ गृहमंत्री लाभले, सत्ताधारी पक्षातील नेते असाल तर तुमच्या चौकशीचे पुढे काही होत नाही, ती प्रलंबितच राहते असा आरोप भाजपाने गृहमंत्री अनिल देशमुखांवर केला आहे ज्या मंत्र्याच्या अनैतिक संबंधाने राज्यात गदारोळ माजवला. त्या धनंजय मुंडे यांचे प्रकरणदेखील प्रलंबितच आहे. निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती देणे, बलात्कार यासारखे गंभीर आरोप असतानाही ‘आपला तो बाब्या’ यामुळे या प्रकरणात देखील चौकशी गृहमंत्र्यांनी प्रलंबित ठेवली आहे, असं भाजपनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. याशिवाय जितेंद्र आव्हाडांच्या प्रकरणावरुनही भाजपनं निशाणा साधला आहे. भाजपनं म्हटलं, की सोशल मीडियावर टीका केली म्हणून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अभियंत्याला निवासस्थानी बोलवून मारहाण केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी चौकशीही प्रलंबितच आहे. पक्षप्रेमापोटी अशा अनेक प्रकरणांची चौकशी गृहमंत्र्यांना प्रलंबित ठेवावी लागत असावी. सिरम इंन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीच्या चौकशीचे पुढे काय झाले? हे केवळ चौकशीकार गृहमंत्र्यांनाच माहित आहे. सिरमला लागलेली आग हे कोणाचे षडयंत्र होते की फक्त अपघात याची चौकशी ही अन्य चौकशींप्रमाणे प्रलंबितच राहिली. तर, देशाच्या आर्थिक राजधानीत १२ ऑक्टोबरला वीज पुरवठा अचानक खंडित झाला. राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर सवयीप्रमाणे चौकशीकार गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. याही प्रकरणाची चौकशी अद्याप प्रलंबितच आहे, असंही भाजपनं यावेळी म्हटलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Anil deshmukh, Pooja Chavan, Sanjay rathod

    पुढील बातम्या