पुणे, 19 ऑगस्ट : राज्यभरात आज दहीहंडीचा उत्साह बघायला मिळाला. मुंबई, ठाणे आणि पुण्यात तर प्रचंड जल्लोष होता. दहीहंडीच्या उत्साहाचे अनेक व्हिडीओ आतापर्यंत समोर आले आहेत. यापैकी एक व्हिडीओ आता अनेकांचे लक्ष वेधून टाकेल असाच आहे. पुण्याच्या कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळ संघाने बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी सहा थर लावून फोडली. विशेष म्हणजे हंडी फोडली तेव्हा सर्वात वरच्या म्हणजे सहाव्या थरावरचा गोविंदा हा हंडीलाच लटकला आणि इतर थरावरचे गोविंदा हे खाली पडले. यावेळी सहाव्या थरावरील गोविंदाने हंडी फोडली आणि हंडी बांधलेल्या दोरीला घट्ट पकडलं. अतिशय थरारक असा हा क्षण होता. हा क्षण कॅमेऱ्यात अतिशय अचूकपणे कैद झाला आहे. ढोल-ताशांचा पारंपरिक गजर आणि गोविंदा आला रे आला… च्या जयघोषात कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळ दहीहंडी संघाच्या गोविंदांनी बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी ६ थर लावून फोडली. शुक्रवारी रात्री ०९ वाजून १८ मिनीटांनी अवघ्या तिसर्या प्रयत्नात दहीहंडी फोडण्यात गोविंदांना यश आले. मच गया शोर… काठी न घोंगडे… सारख्या पारंपरिक गाण्यांप्रमाणेच नव्या गाण्यांवर तरुणाईने ताल धरत गोपाळकाला व दहीहंडी उत्सव साजरा केला. विशेष म्हणजे ज्यावेळी हंडी फोडली त्यावेळी अतिशय चित्त थरारक अशा क्षणाची प्रेक्षकांना अनुभूती आली. हंडी फोडण्यासाठी सहाव्या थरावर चढलेला गोविंदा हा हंडीलाच लटकला आणि त्याचे इतर सहकारी हे खाली पडले. पण यावेळी गोविंदा घाबरला नाही. त्याने हंडी फोडली. त्यानंतर गोविंदांनी मोठा जल्लोष केला. पण हंडी फोडल्यानंतर वरती लटकलेला गोविंदा हा तशात अवस्थेत राहिला. काही वेळाने जमिनीवर असलेल्या गोविंदांनी त्याला इशारा केला आणि त्याने खाली उडी मारली. यावेळी इतर गोविंदांनी त्याला अलगद झेललं. त्यानंतर गोविंदांनी एकच जल्लोष केला. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय.
VIDEO : पुण्यात साहसाची परिसीमा, गोविंदा सहाव्या थरावर लटकला, थरारक अनुभव #pune #dahihandi2022 pic.twitter.com/zWyPHRSG7K
— News18Lokmat (@News18lokmat) August 19, 2022
( दहीहंडीच्या उत्साहाला गालबोट, रत्नागिरीत गोविंदाचा मृत्यू, धक्कादायक घटना ) बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे कोविड संकटानंतर दोन वर्षांच्या कालावधीनंतर मोठया जल्लोषात यंदा दहीहंडी उत्सव कोतवाल चावडी येथे साजरा करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, सौरभ रायकर, सचिन आखाडे, मंगेश सूर्यवंशी, अमोल चव्हाण, तुषार रायकर यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. कसबा पेठेतील गणेश मित्र मंडळ दहीहंडी पथकातील गोविंदाने हंडी फोडताच गोपाळभक्तांनी एकच जल्लोष केला. दहीहंडी संघाला सन्मानचिन्ह, २५ हजार रुपये, गणेशाची प्रतिमा बक्षिस म्हणून देण्यात आली. सुरुवातीला सायंकाळी नादब्रह्म ढोल ताशा पथक ट्रस्टमधील वादकांनी पारंपरिक वाद्यवादन करुन उपस्थितांना ठेका धरायला लावला. पुण्यासह इतर शहरांतून गोविंदा पथके दहिहंडी फोडण्याकरीता आली होती, असे मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी सांगितले.