पुणे 26 ऑगस्ट : विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ITMS प्रकल्प राबवण्यास सुरुवात होत आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ITMS म्हणजेच इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम प्रकल्प राबवण्यास सुरुवात होत आहे. यासाठीच आज शुक्रवारी या महामार्गावर दोन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे.
ITMS प्रकल्पाचा एक भाग म्हणजे ओव्हर हेड ग्रँटी बसवण्यासाठी एक्सप्रेस हायवेवर ब्लॉक घेण्यात आला आहे. किवळे ते सोमटने दरम्यान हे काम केलं जाणार आहे. आज दुपारी 12 ते 2 दरम्यान हा ब्लॉक घेतला जात आहे. त्यामुळे या 2 तासांमध्ये किवळे ते सोमाटणे मार्गावरुन वाहनधारकांना जाता येणार नाही. वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या वतीने करण्यात आलं आहे.त्यामुळे दोन तासासाठी जुन्या पुणे मुंबई-महामार्गाकडे वाहतूक वळवली जाणार आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर उद्या 2 तासांचा ट्रॅफिक ब्लॉक; प्रवासादरम्यान होणार मोठा बदल
पर्यायी मार्ग -
पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक किवळे ते देहू रोड मार्ग, राष्ट्रीय महामार्ग 48 वरून तसंच सोमाटणे फाटा ते द्रुतगती मार्गावरील तळेगाव पथकर नाका मार्गे वळवण्यात येणार आहे.
आयटीएमएस म्हणजे काय -
आयटीएमएस या सिस्टिमद्वारे वाहतुकीचं नियंत्रण सॅटेलाईटद्वारे होणार आहे. या प्रणालीमध्ये ड्रोनचाही वापर केला जाणार. महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनाचा रेकॉर्ड ठेवला जाईल. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवण्यात येईल. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचेल. संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं असेल. हे कॅमेरे लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवतील. यासोबतच अशा वाहनांना अडवण्याचं निर्देश पोलिसांना मिळतील. ज्यामुळे अशा वाहनांना अडवून संभाव्य अपघात टाळता येतील. विनायक मेटे यांच्या अपघातानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Traffic, Vinayak mete