Home /News /maharashtra /

आम्ही कट्टर शिवसैनिक, उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं ऐकावं : विजय शिवतारे

आम्ही कट्टर शिवसैनिक, उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं ऐकावं : विजय शिवतारे

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव मान्य करण्याची विनंती केली.

    पुणे, 29 जुलै : शिवसेनेचे बंडखोर नेते उद्या मुंबईत दाखल होणार आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीला त्यांच्या पक्षातील आमदारांनी चांगला पाठिंबा दिला आहे. शिंदे यांच्यासोबत अपक्षांसह एकूण 51 आमदार असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या या बंडखोरीवरुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून टोकाची टीका केली जातेय. तर दुसरीकडे शिवसेनेत असलेल्या दिग्गज नेत्यांकडून बंडखोरांना पाठिंबा दिला जात असल्याचं चित्र आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदे यांचा प्रस्ताव मान्य करण्याची विनंती केली. तसेच आपलादेखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच आपण इतर नेत्यांसोबत मिळून उद्धव ठाकरेंना ठराव आणि पत्र पाठवल्याचं विजय शिवतारे म्हणाले आहेत. विजय शिवतारे नेमकं काय म्हणाले? "जे काही सध्या राजकीय स्थित्यंतर चाललेलं आहे त्याबाबत राज्याचा एक माजी मंत्री म्हणून आणि शिवसेनेचा आणि पुणे जिल्ह्यातील एक नेता म्हणून मी माझी भूमिका मांडण्यासाठी आलो आहे. माझी भूमिका जाहीर झालेली आहे. ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार हे सुरत आणि तिथून गुवाहाटीला गेले आणि 22 तारखेपासून त्यांनी उद्धव ठाकरेंना विनंती केली की, राष्ट्रवादी, काँग्रेससोबत सत्तेत राहून शिवसेनेच्या शिलेदारांना दाबलं जातंय. प्रत्येक मतदारसंघात अन्याय होतोय. हे सहनशक्तीच्या पलिकडे गेलंय म्हणून आपण विचार करावा आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडावं. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत फारकत घ्यावी", असं आवाहन शिवतारे यांनी केलं. "आपल्या नैसर्गिक युतीचा जो मित्र होता, हिंदुत्व घेऊन पुढे चालणाऱ्या पक्षासोबत आपण पुढाकार घेऊन पुन्हा त्याचा हात धरावा. त्यातून सरकार बनवावं, अशा प्रकारची विनंती केली होती. दुर्देवाने या विनंतीला पाच-सहा दिवस थांबूनही कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. त्याउलट एकनाथ शिंदेंच्या भूमिकेला प्रतिसाद देण्याऐवजी सर्व आमदारांची निर्व्यसना केली गेली. एखाद्या कार्यकर्त्याला आमदार होण्यासाठी तीस-तीस वर्ष मेहनत घ्यावी लागते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झालेले आमच्यासारख्या आमदारांनीदेखील पाच-पाच वेळा मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे. अशा सर्व लोकांनी एकमेकांशी चर्चा करुन आम्ही ठरवलं महाविकास आघाडीसोबत एकत्र राहायचं नाही", असं शिवतारे यांनी सांगितलं. (आता काय करायचं? पवारांच्या बैठकीला दांडी मारल्यानंतर ‘मातोश्री’वर खलबतं!) "आमच्यासमोर गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी लढली आहे. महाविकास आघाडी सरकारने असंच लढायचं ठरवलं तर 52 मतदारसंघांमध्ये जे मतदार शिवसेनेला मतदान करतात अशा लाखो लोकांना वाऱ्यावर सोडल्यासारखं होईल. आढळराव सारखा माणूस दयनीय पद्धतीने राष्ट्रवादीच्या लोकांना आम्हाला शिवसैनिकाला जगू द्या, अशी विनवणी करतो", असं शिवतारे म्हणाले. "आम्हाला न्याय मिळावा, अशी विनंती अनेकवेळा केली. पण जे काही संरक्षण हवं होतं ते मिळालं नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे आहोत. उद्धव ठाकरे अतिशय सज्जन माणूस. पण त्यांना अक्षरश: घेरलंय की काय? अशी परिस्थिती आहे. त्यांच्यासोबत आमचे चांगले संबंध आहेत. आम्ही तुमच्याबरोबर आहोत पण काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहणार नाहीत. आम्ही तुमच्यासोबत आहोत. पण निर्णय तातडीने घ्या. आम्ही उद्धव ठाकरेंचेदेखील शिवसैनिक आहोत. आम्ही दोन-अडीच वर्ष तक्रार केल्यानंतरही ते त्या चक्रव्युव्हातून बाहेर पडत नसतील तर काय होतंय? असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे. म्हणून पर्याय काय आहे? 51 आमदारांनी आधीच सांगितलं आहे. आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत. उद्धव ठाकरेंनी विचार करुन मार्ग काढावा. एकनाथ शिंदेंचं ऐकावं. अशाप्रकारचा ठराव आणि पत्र पाठवत आहोत", अशी माहिती शिवतारे यांनी दिली.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shiv sena

    पुढील बातम्या