पुणे, 24 ऑक्टोबर : पुरंदर विमानतळाच्या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर तोफ डागली आहे. विमानतळासाठी जागा निश्चित केलेली असताना नव्या सरकारने निर्णय फिरवल्याची टीका पवारांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळाचा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणावरून खुद्द शरद पवारांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
महाविकासआघाडी सरकार असताना शरद पवारांनी पुरंदर विमानतळाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला होता, मात्र सत्तांतरानंतर पुरंदर विमानतळाबाबत शिंदे सरकारचा सूर बदलला, त्यामुळे पवारांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
'मला या सरकारचं नेमकं काय चाललंय समजत नाही. आधी जो निर्णय झाला त्याला 7-10 गावांनी विरोध केला, पण त्यानंतर आम्ही सरकारशी बोललो. सरकारने आम्हाला सांगितलं, दुसरी जागा द्या. दुसरी जागा दाखवली, त्यासाठी दिल्लीला बैठक बोलावली. अपेक्षा होती आता काहीतरी निर्णय होईल. इथं सरकार बदललं. नव्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगून टाकलं ते होणार नाही. त्याची चर्चा करायचं कारण नाही. तुमच्या हातात सत्ता आहे. तुम्ही काय करायचं ते करा. एकदा कुठेतरी विमानतळ, पुरंदरचा विकास करा. हा प्रश्न नुसता पुरंदरचा नाही, पुणे जिल्ह्याचा आहे,' असं शरद पवार म्हणाले.
काय आहे वाद?
पुरंदर तालुक्यातील पारगाव, खानवाडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी, उदाचीवाडी या गावांमधल्या जमिनीची निवड विमानतळासाठी करण्यात आली होती. पण महाविकासआघाडी सरकारने या जागेत बदल सुचवला होता. केंद्र सरकार, संरक्षण मंत्रालयाने याला नकार दिला होता, त्यामुळे पुरंदर विमानतळ प्रकल्प रखडला होता.
दरम्यान सत्तांतरानंतर शिंदे सरकारने महाविकासआघाडीचा निर्णय फिरवला. शिंदे सरकारच्या या निर्णयावर शरद पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यातील सध्याचं विमानतळ हे संरक्षण खात्याच्या जागेवर असल्यामुळे अनेक मर्यादा येतात, त्यामुळेच पुरंदरला पर्यायी विमानतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र विमानतळाच्या जागेवरून नेत्यांमध्ये राजकारण रंगल्याचं चित्र आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.