मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'A म्हटलं की अमेठी B म्हटलं की बारामती, अमेठीचा कार्यक्रम केला, आता टार्गेट बारामती', पवारांच्या पराभवासाठी भाजपची रणनीती

'A म्हटलं की अमेठी B म्हटलं की बारामती, अमेठीचा कार्यक्रम केला, आता टार्गेट बारामती', पवारांच्या पराभवासाठी भाजपची रणनीती

राम शिंदे आणि शरद पवार यांचा फाईल फोटो

राम शिंदे आणि शरद पवार यांचा फाईल फोटो

"A म्हटलं की अमेठी B म्हटलं की बारामती. A चा कार्यक्रम 2019 लाच केलाय. 2019 ला बारामतीचा कार्यक्रम हुकला. तो 2024 ला करायचा आहे", असं विधान राम शिंदे यांनी केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 3 सप्टेंबर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लवकरच बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यावरुन भाजप 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या चर्चा खऱ्या ठरताना दिसत आहेत. कारण यावर भाजप नेते राम शिंदे यांनीच शिक्कामोर्तब केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षालादेखील टोला लगावला. 'A म्हटलं की अमेठी आणि B म्हटलं की बारामती, अमेठीचा कार्यक्रम केला आहे, पण आता बारामतीचा कार्यक्रम करायचा आहे', असं सूचक विधान राम शिंदे यांनी केलं आहे.

"A म्हटलं की अमेठी B म्हटलं की बारामती. A चा कार्यक्रम 2019 लाच केलाय. 2019 ला बारामतीचा कार्यक्रम हुकला. तो 2024 ला करायचा आहे. त्याच्यासाठीच 17 महिने अगोदरच हे नियोजन सुरू आहे. आणि हे नियोजन असे तसे नसून देशाच्या अर्थमंत्री येणार आहेत. देशाच्या अर्थमंत्री राज्यात येवून त्या तीन दिवस बारामतीत असणार आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक किती गांभीर्याने घेतली आहे हे लक्षात येईल. ही निवडणूक जिंकायचीच आहे", असं राम शिंदे म्हणाले.

"दिवस बदलतात पावसाळा झाला की हिवाळा येतो आपल्याला उन्हाळा होता आता पावसाळा आला आहे. वातावरणात बदल होत असतो. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही", असं सूचक विधान राम शिंदे यांनी केलं.

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्रात शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली आहे. त्यामुळे आता पुढच्या निवडणुकांमध्ये भाजपपुढे राष्ट्रवादी काँग्रेसचं कडवं आव्हान असणार आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करण्यासाठी भाजपने मेगा प्लॅन आखला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती तालुक्यात भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी भाजपने अनेक दिग्गज नेत्यांना कामाला लावलं आहे. विशेष म्हणजे त्याच ध्येयातून केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण या बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

(4 आमदार बाहेर पडले तरी एकनाथ शिंदेंचा पुढील प्लान फ्लॉप; आमदारांच्या घरवापसीची भीती)

राज्यात शिवसेना हा मोठा पक्षांपैकी एक होता. पण शिवसेनेत फूट पाडण्यात भाजपला यश आलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं भाजपपुढे कडवं आव्हान ठरु शकतं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात पवार कुटुंबातील उमेदवाराला परभाव करण्याचा भाजपचा डाव आहे. पवार कुटुंबातील दिग्गज नेत्याचा बारामती मतदारसंघातून पराभव केला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण होईल, असा भाजपचा डाव आहे.

दुसरीकडे राम शिंदे यांनी अमेठीचा उल्लेख करण्यामागे देखील महत्त्वाचं कारण आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघातून पराभव केला होता. पण त्यावेळी राहुल गांधी दोन मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे होते. एक अमेठी आणि दुसरा म्हणजे वायनाड मतदारसंघ. राहुल गांधी यांचा अमेठीमधून पराभव झाला असला तरी वायनाड मतदारसंघातून ते विजयी झाले होते. पण त्यांचा अमेठीमधील पराभवावरुन भाजपने काँग्रेसला अनेकदा डिवचलं आहे. त्यातूनच आज राम शिंदे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.

First published:

Tags: Baramati, BJP, NCP, Sharad Pawar