पुणे, 24 सप्टेंबर : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या संघटनेवर देशभरात करण्यात आलेल्या कारवाईवरुन पुण्यात आंदोलन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातला आंदोलनाचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. या आंदोलनात सहभागी झालेले आंदोलक पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा करत असल्याचं संबंधित व्हिडीओत दिसत आहे. याच व्हिडीओवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पीएफआय आणि संबंधित आंदोलकांवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी फेसबुकवर संबंधित व्हिडीओ शेअर करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे घोषणाबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच ही कीड समूळ नष्टच करा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. याशिवाय ‘तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा’ असा देखील उद्गार राज ठाकरे यांनी काढला आहे. “एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे”, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे आणखी काय म्हणाले? “ही अटक कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणे, ह्या गंभीर आरोपांखाली… थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही ह्या देशद्रोह्यांचं समर्थन करत जर ह्या PFI च्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशांत चालणार नाहीत”, असं ठाकरेंनी बजावलं. ( एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र, शिवसेनेमध्ये पुन्हा मोठं खिंडार ) “माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त ह्या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या ह्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की यापुढे पाण्यासाठी देखील (पा) उच्चारता येणार नाही”, असं ते म्हणाले.
“नाहीतर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. ह्या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे”, अशी मागणी राज ठाकरेंनी केली.