मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Pune: पुण्यात मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार झटापट, VIDEO

Pune: पुण्यात मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार झटापट, VIDEO

पुण्यात मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार झटापट, VIDEO

पुण्यात मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार झटापट, VIDEO

Pune News: पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला आहे. हा वाद इतका वाढला की चक्क पदाधिकाऱ्यांमध्ये झटापट झाली आहे.

पुणे, 19 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे दोन दिवस पुणे (Pune) दौऱ्यावर होते. राज ठाकरे यांची पुण्यात सभा सुद्धा लवकरच होणार आहे. मात्र, त्याच दरम्यान मनसेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं पहायला मिळालं. शिवाजीनगरचे मनसे पदाधिकारी यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर या वादाचं रुपांतर चक्क झटापटीत झालं असल्याचं समोर आलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या संदर्भात आयोजित बैठकीत निमंत्रण न दिल्याने मनसे पदाधिकाऱ्यांत वाद झाला. शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि विद्यार्थी सेनेचे शैलेश विटकर यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की, चक्क झटापटही झाली.

रणजित शिरोळे विभाग अध्यक्ष असुन कुठल्याच बैठकांना का बोलावत नाही याचा जाब शैलेश विटकर यांनी बैठकीत विचारला. यानंतर संतापलेले रणजित शिरोळे हे अंगावर धावून गेले. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली.

पुणे शहराध्यक्ष आणि मनसेच्या सर्व नेत्यांसमोर हा वाद झाला. अयोध्या दौऱ्यासंबंधी नावनोंदणी आणि सभेच्या नियोजनाच्या बैठकी दरम्यान हा वाद झाला. या प्रकारामुळे मनसेची गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

राज ठाकरेंची सभा कधी?

मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभांचा धडाका लावला आहे. मुंबई, औरंगाबादपाठोपाठ आता 21 तारखेला पुण्यात सभेचं आयोजन करण्यात आले आहे. मात्र, दोन दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची सभा होणार की नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे. ही सभा रद्द करावी लागणार अशी चर्चा रंगली होती. पण, आता सभेसाठी दोन जागेची चाचपणी सुरू आहे. या दोन्ही जागेबद्दल परवानगी सुद्धा मिळालेली आहे, गुरुवारी दुपारच्या सुमारास सभा कुठे होणार आणि कधी होणार याबद्दल घोषणा केली जाईल, अशी माहिती मनसेचे नेते बाबू वागस्कर यांनी दिली. राज ठाकरे यांची नदीपात्रात सभा होण्याऐवजी पावसामुळे सभागृहामध्ये सभा घेण्याचं नियोजन सुरू आहे. गणेश कला क्रीडा रंगमंदिरात सभा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

First published:

Tags: MNS, Pune, Raj Thackeray