पुणे, 16 जून : झाडाच्या फांद्या तोडणं दोन जणांच्या चांगलंच अंगाशी आलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) सोसायटी कंपाऊंडच्या बाहेर आलेल्या झाडाच्या फांद्या तोडल्याप्रकरणी बारामतीत दोन जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात (Baramati City Police station) हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे निसर्गप्रेमी आहेत. अजित पवारांचे झाडांवर प्रचंड प्रेम आहे. झाडे लावण्याचा तसेच निसर्ग जपण्याचा सल्लाही ते अनेकदा देत असतात. आपल्या भाषणातही अनेकदा याबाबत नागरिकांना, कार्यकर्त्यांना सल्ला देताना दिसून येतात. मात्र, अजित पवारांचं हे वृक्षप्रेम काहींजण विसरले आणि आता त्याचा फटका त्यांना बसला आहे.
अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग सोसायटीच्या कंपाऊंडच्या बाहेर आलेल्या झाडाच्या फांद्या तोडल्यामुळे 2 जणांविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी संतोष वाबळे यांनी वृक्षांच्या फांद्यांची तोड केल्याप्रकरणी 2 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाचा : तब्बल 12 तास केलं कीर्तन! 'वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया' मध्ये झाली नोंद
2 दिवसांपूर्वी अजित पवारांच्या सहयोग सोसायटी या निवासस्थानी कंपाऊंडच्या आत असलेल्या झाडांच्या फांद्या या कंपाऊंड बाहेर आल्या होत्या. फांद्या तोडणी सुरू असल्याचे संतोष वाबळे यांच्या ध्यानात येताच त्यांनी कुणाच्या परवानगीने झाडं तोडत आहात असे विचारलं. त्यावर त्यांनी दिलीप जगदाळे यांच्या सांगण्यावरून तोडत आहे असं सांगितले. यावेळी त्यांच्याकडे झाडे तोडण्याचा परवाना आहे किंवा परवानगी आहे का असे विचारले. परंतु झाडे तोडणाऱ्या कडे परवानगी नव्हती अशी माहिती बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली.
तसेच काहीजण हे फांद्या घेऊन जाताना दिसले. त्यावेळी झाडे तोडण्याऱ्यांनी तोपर्यंत फायकस जातीच्या झाडाच्या 20 ते 25 फांद्या तोडल्याचं आढळून आलं. त्यानंतर संतोष वाबळे यांनी पांडुरंग माने आणि दिलीप जगदाळे यांच्या विरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या प्रकरणी तक्रारीनुसार, बारामती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चोरीचा तसेच महाराष्ट्र( नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 चे कलम 21 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.