पुणे, 1 सप्टेंबर : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिकेच्या विभाजनाबद्दल एक मोठं विधान केलं आहे. पुणे महापालिकेचे किमान 2 भाग करण्याची आवश्यकता आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानामुळे पुणे महापालिकेचे भविष्यात दोन भाग होऊ शकतात, अशा चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी गोवा राज्याचं उदाहरण दिलं आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशन आणि राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर हात घातला. विशेष म्हणजे त्यांनी पुणे महापालिकेच्या विभाजनाबाबत मोठं आणि महत्त्वाचं विधान केलं आहे. “पुण्यात आता 23 नवीन गावं समाविष्ट झाली आहेत. देशातील कुठल्याही महानगर पालिकेपेक्षा पुण्याचे क्षेत्र मोठं झालं आहे. त्यामुळे आता पुणे महानगर पालिकेचे किमान 2 भाग करण्याची आवश्यकता आहे. मी हे राजकीय बोलत नाहीय. कारण युनिट जेवढं छोटे होईल तेवढे ते मॅनेज होतं”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ( महाराष्ट्रातील ‘या’ चार नेत्यांपैकी एक जण घेऊ शकतो सोनिया गांधींची जागा? ) “जी राज्य लहान आहेत म्हणजे गोवा, तिथला मुख्यमंत्रीला बायकोने सांगितले की मासळी बाजारात जाऊन मासेवल्याला जाऊन भेटतो. कारण तिथे 40 मतदारसंघ 12 मंत्री आहेत. त्यामुळे तिथला मुख्यमंत्री सगळ्यांच्या घरी जाऊन भेटतो. त्यांच्या घरी जाऊन जेवतो. त्यामुळे काही स्मॉल युनिट मॅनेजेबल असतात”, असंदेखील चंद्रकांत पाटील म्हणाले. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी चांदनी चौकातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर देखील भाष्य केलं. “मी वाहतुकी बाबत बैठक घेतली. चांदनी चौकामध्ये तो रस्ता ६ लेन होत नाही तोपर्यंत मोठ्या गाड्यांना बंदी हे उत्तर नाहीय. त्यांनी एका लेन मधूनच जायचे आहे. दोन लेन जर चार चाकीसाठी दिल्या तर त्या गाड्या लवकर जातील आणि टेम्पो ट्रक बाजूने जातील”, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)








