जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महाराष्ट्रातील 'या' चार नेत्यांपैकी एक जण घेऊ शकतो सोनिया गांधींची जागा?

महाराष्ट्रातील 'या' चार नेत्यांपैकी एक जण घेऊ शकतो सोनिया गांधींची जागा?

महाराष्ट्रातील 'या' चार नेत्यांपैकी एक जण घेऊ शकतो सोनिया गांधींची जागा?

काँग्रेसमध्ये सध्या अभूतपूर्व बदलाचे संकेत जाणवत आहेत. कारण पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा आता गांधी घराण्यातील सदस्याच्या हाती राहणार नाही.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 1 सप्टेंबर : काँग्रेसमध्ये सध्या अभूतपूर्व बदलाचे संकेत जाणवत आहेत. कारण पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा आता गांधी घराण्यातील सदस्याच्या हाती राहणार नाही. काँग्रेस अध्यक्षपदासाठी लवकरच मतदान होणार आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेमकी कुणाची वर्णी लागते, हे येत्या काळात समोर येईलच. पण त्याआधी अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील चार बड्या काँग्रेस नेत्यांच्या नावांची चर्चा आहे. या चार नेत्यांपैकी एकजण काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष बनू शकतो. काँग्रेस अध्यक्षपदासाठी 17 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. तर 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची अधिसूचना 22 सप्टेंबरला जारी होणार आहे. तर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. या निवडणुकीच्याआधी अध्यक्षपदाच्या शर्यतीत कोण कोण आहे, याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. या रेसमध्ये महाराष्ट्रातील तीन बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे, मुकूल वासनिक यांच्या नावांचा समावेश आहे. नाना पटोले यांचं नाव का चर्चेत? नाना पटोले यांचं नाव सोनिया गांधी यांच्या गुडबूकमध्ये आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. नाना पटोले यांचा राजकीय प्रवास बोलका आहे. ते भाजप पक्षाच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले होते. पण त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मतभेद झाले म्हणून त्यांनी थेट खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात सहभागी झाले होते. नाना पटोले आक्रमकपणे काँग्रेससाठी काम करत राहिले. त्यांच्या कार्याची दखल काँग्रेसच्या हाय कमांडला घ्यावी लागली. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हा नाना पटोले यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. त्यावेळी नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष होते. पण त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली म्हणून विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. नाना पटोले यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या कामांचा धडाका सुरुच ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्या कामांवर हायकमांड खूश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ( मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले मिलिंद नार्वेकरांच्या घरी ) पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा का? पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्रातील काँग्रेसचा एक मोठा चेहरा आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीदेखील राहिले आहेत. चव्हाण यांचा अनुभव पाहता त्यांना काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी मिळू शकते, अशी चर्चा होते. गेल्यावर्षी काँग्रेसच्या काही दिग्गज नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. त्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण हे देखील होते. याशिवाय गेल्या आठवड्यात काँग्रेसची महत्त्वाची बैठक झाली होती. त्या बैठकीतही त्यांनी आपली भूमिका मांडली होती. काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांनी पक्ष नेतृत्वाला घरचा आहेर दिला होता. एकंदरीत सध्याच्या घडामोडी पाहता पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसला नवसंजीवनी देवू शकतात, त्यामुळे त्यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी चर्चा आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा का? सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं नाव सन्माने घेतलं जातं. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली. त्यावेळी सुशील कुमार शिंदे यांना उमेदवारी देण्याबद्दल चर्चा झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारीला नकार दिल्यानंतर सुशील कुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा आली होती. त्यानंतर आता काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत सुशील कुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. सुशील कुमार शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदाची देखील सूत्रे हाताळली आहेत. त्यांना देशभरातील नागरीक ओळखतात. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे. मुकूल वासनिक यांच्या नावाची चर्चा का? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकूल वासनिक हे सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय आहेत. ते सोनिया गांधी यांचे विश्वासू नेते आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, नाना पटोले यांच्या पाठोपाठ मुकूल वासनिक यांच्या नावाची चर्चा आहे. हे चारही नेते महाराष्ट्राचे आहेत. त्यामुळे या नेत्यांपैकी कुणीही काँग्रेसचा अध्यक्ष बनला तरी तो महाराष्ट्राचाच असेल. महाराष्ट्राचा नेते काँग्रेस पक्षाचं केंद्रीय पातळीवर नेतृत्व करु शकतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात