पुणे, 18 ऑक्टोबर : पुण्यात परतीच्या पावसाने मध्यरात्री अक्षरश: धुमाकुळ घातला होता. यामुळे पुण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांच स्वरुप आल्याचं पाहायला मिळालं. पावसाच्या धुमाकुळामुळे जनजीवन विस्कळीत झालं आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. पुण्यात गेल्या दोन आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. या पावसामुळे पुण्याची ड्रेनेज सिस्टीम पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे समोर आले आहे. याबाबत नक्की कोणाच्या चुका होत आहेत किंवा पुण्यामध्ये काय बदल होणे अपेक्षित आहेत. याचीच माहिती टाऊनशिप मॅनेजमेंट अभ्यासक सारंग यादवडकर यांनी News 18 लोकमतशी बोलताना दिली आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे प्रमाण आणि ढगफुटी प्रमाण वाढले पुण्यामध्ये गेल्याकाही दिवसांमध्ये जो पाऊस पडत आहे. याला काही शास्त्रीय कारणे आणि प्रशासकीय कारणे आहेत. शास्त्रीय कारणांमध्ये वैश्विक कारणे आणि स्थानिक कारणे हे दोन भाग आहेत. वैश्विक कारणामध्ये ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे प्रमाण आणि ढगफुटी प्रमाण वाढले आहे. जी स्थानिक स्वरूपाचे शास्त्रीयकारण आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात टेकडी फोड करणे आणि झाडे तोडणे हे आहे. त्यामुळे माती मोठ्या प्रमाणावर वाहून जात आहे. पावसाच्या पाण्याला जमिनीत मुरायला कुठेच जागा मिळत नाही. हेही वाचा : मध्यरात्रीपर्यंत सुरू होतं पावसाचं थैमान, गाड्या पाण्यात वाहत होत्या, पुण्याचे 5 धक्कादायक VIDEO प्रशासकीय कारणे शहरामध्ये नदी, नाले, ओढे आहेत ते पूर्णपणे प्रशासनाच्या आणि राजकीय स्वार्थ पोटी बुजवले गेलेले आहेत. 2014 साली टेरी या संस्थेने महाराष्ट्र शासनाला लेख रिपोर्ट सादर केला होता. त्यांनी या अहवालामध्ये स्पष्ट सांगितले होते की 2030 सालापर्यंत पावसाचे प्रमाण पुण्यामध्ये 32 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. पावसासोबतच ढगफुटी देखील प्रमाण वाढणार आहे. हा अहवाल पुणे महानगरपालिका आणि आयुक्तांना माहिती असून सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाही केली नाही, असं टाऊनशिप मॅनेजमेंट अभ्यासक सारंग यादवडकर सांगितले. यामध्ये सर्वात जास्त बळी पडतो सामान्य नागरिकांचा प्रशासकीय आणि राजकीय व्यक्तींची हितसंबंध जोपासण्यासाठी अनेक इमारतींसाठी नदी, नाले बुजवले गेलेले आहेत. नदीकडे वाहून नेणाऱ्या स्ट्रॉंम वॉटर ड्रेन सिस्टीमचे मेंटेनन्स नीट झालेले नाही. त्याचं डिझाईन जे आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालेले आहे. थोडक्यात काय तर जे विकास म्हणून जी कामे प्रशासनाने राजकारणी लोकांनी शहरासाठी राबवले आहेत ते चुकीचे आहे. हेही वाचा : पुण्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, बिबवेवाडीत ढगफुटीसारखा पाऊस, VIDEO पुण्यामध्ये नदीकाठ विकास योजना 5000 कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नदीची रुंदी कमी केली जाणार आहे. हे जर झालं तर आत्ता पेक्षाही मोठी भयावह परिस्थिती पुण्यामध्ये जास्तीत जास्त वेळा होण्याची शक्यता निर्माण होईल. मी तर हे नेहमी म्हणतो की आत्ता आपण जे बघत आहे ते छोटे छोटे ट्रेलर आहेत. पिक्चर अभी बाकी है! आणि तो पिक्चर पाहिल्यावरती हे पुणे शिल्लक असेल की नाही हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे, असंही सारंग यादवडकर यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.