चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी पुणे, 3 नोव्हेंबर : अजित पवार आणि जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमधले दोन प्रमुख नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना या नेत्यांना नेहमीच झुकतं माप दिल्याचं पाहायला मिळतं. महाविकासआघाडी सरकारही त्याला अपवाद नाही. सत्तेतून पायउतार झाल्यानंतर अजित पवारांकडे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद आलं. तर जयंत पाटलांच्या खांद्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपावण्यात आली. अजित पवार आणि जयंत पाटील या दोन नेत्यांमधल्या राजकीय कारकिर्दीचा विचार करता जयंत पाटील हे अजित पवारांना सिनियर आहेत. पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवारांच्या वक्तशीरपणाचं कौतुक करताना जयंत पाटलांनी आपल्या सिनियॉरिटीची आठवण करून दिली. 1990 साली आम्ही विधानसभेत गेलो, तसे विधानसभेला आम्हाला दादा ज्युनियर आहेत, कारण ते लोकसभेला होते. साहेब जेव्हा लोकसभेला गेले तेव्हा दादा विधानसभेला आले. पण तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 7 निवडणुका झाल्या, असं जयंत पाटील म्हणाले. पुण्यात अजित पवारांच्या सभेआधी गोंधळ, बॅनर लावण्यावरून मोठा वाद जयंत पाटील आणि अजित पवार यांनी एकाच वेळी म्हणजेच 90 च्या दशकात आपली राजकीय कारकिर्द सुरू केली. 1990 पासून जयंत पाटील विधानसभेवर निवडून येत आहेत, तर 1991 मध्ये अजित पवार लोकसभेवर निवडून गेले, पण पुढे त्यांना शरद पवारांसाठी राजीनामा द्यावा लागला होता. 1992 मध्ये अजित पवारांची विधानसभेत एण्ट्री झाली. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांना विधानसभेवर आपण सिनियर आहोत, असं जयंत पाटील यांनी म्हणलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात अजित पवारांनी गृहमंत्रीपदाकरता आग्रह धरला होता, पण शरद पवारांनी अजित पवारांऐवजी जयंत पाटलांना गृहमंत्री केलं होतं. पुण्यातील एका जाहीर कार्यक्रमात अजित पवारांनी ती खंत व्यक्तही केली होती. महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर जयंत पाटील यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद जाणार, असं बोललं जात होतं, पण शरद पवारांनी अजित पवारांना झुकतं माप दिलं. या राजकीय पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमध्ये सुप्त स्पर्धा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शरद पवारांना आजही डिस्चार्ज नाही; प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.