पुणे, 23 सप्टेंबर : शहरातील विविध चौकांमध्ये आणि पदपथांवर उभारलेल्या ‘आय लव्ह ……’ डिजिटल नामफलक आणि संकल्पनेचे नामफलक काढण्याचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी आकाश चिन्ह व परवाना विभागाला दिले आहेत. त्यामुळे शहरामध्ये असणाऱ्या ‘आय लव्ह…’ आणि एका ठिकाणी एकापेक्षा अधिक असलेल्या संकल्पनेच्या नामफलकांवर हातोडा पडणार आहे. महापालिकेकडून शहरात विविध विकासकामे केली जातात, विविध वास्तू आणि प्रकल्प उभारले जातात. ही कामे मुख्य खात्यांसह नगरसेवकांच्या विकास निधीतूनही केली जातात. या ठिकाणी त्या-त्या विभागाकडून नामफलक लावले जातात. त्यानंतरही नगरसेवकांकडून संकल्पनेच्या नावाखाली पुन्हा स्वतःची नावे टाकून फलक लावले आहेत. संकल्पनेच्या माध्यमातून पालिकेच्या पैशांतून स्वतःसह पक्षाची, नेत्यांची फुकटात प्रसिद्धी करून घेण्याचे नवीन फॅड आले आहे. एकाच चौकात आणि एकाच वास्तूला पूर्वीचे नामफलक सुस्थितीत असताना पुन्हा चार-चार नामफलक लावण्यात आले आहेत. हेही वाचा : Satara : लम्पी आजाराचा बैलगाडा शर्यतीवर परिणाम, लाखोंचं नुकसान होण्याची भीती Video मागील दोन वर्षात तर ‘आय लव्ह ……’ असे इलेक्ट्रॉनिक नामफलक चौकांमध्ये, रस्त्याच्या कडेला, पदपथावर उभे करण्याचे पेव फुटले आहे. हे फलक उभारण्यासाठी वीज जोडण्यासाठी पथ विभाग, किंवा विद्युत विभागाची कोणतीही परवानगी घेतली जात नाही. सभागृहाची मुदत संपल्याने प्रशासनराजमध्ये अशा प्रकारच्या उधळपट्टीला लगाम बसेल अशी अपेक्षा होती. मात्र, यावर काहीही परिणाम झाला नसल्याचे समोर आले आहे. संविधानिक पद नसलेल्यांकडून संकल्पना म्हणून स्वतःची नावे टाकली जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी शहरातील ‘आय लव्ह…’ आणि ‘संकल्पना’च्या नावाखाली जागोजागी उभे केलेले नामफलक, इलेक्ट्रिक फलक काढण्याचे आदेश दिले आहेत. एका वास्तूला किंवा एका चौकात एकच नामफलक, एकापेक्षा अधिक असतील तर एक नामफलक ठेवून इतर फलक काढण्याचेही आदेश आकाश चिन्ह व परवाना विभागाला दिले आहेत. हेही वाचा : सावधान! मुलांमध्ये पसरतोय HMFD आजार, पाहा काय आहेत लक्षणं आणि उपाय Video पावणेपाच महिन्यांत 1 लाख 63 हजार कारवाया शहरातील अनधिकृत जाहिरातबाजीवर महापालिकेच्या अतिक्रमण आणि आकाश चिन्ह व परवाना विभागाकडून कारवाई केली जाते. आकाश चिन्ह विभागाने एप्रिल ते 21 सप्टेंबर या पावणेपाच महिन्यांत 175 जाहिरात फलक (होर्डींग), 39248 बोर्ड, 21425 बॅनर, 20913 फ्लेक्स, 7779 झेंडे, 44285 पोस्टर, 19092 किऑक्स आणि 9802 इतर अशा 1 लाख 63 हजार 719 कारवाया केल्या आहेत. या कारवायांमधून 9 लाख 59 हजार 100 रुपये दंड वसूल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.