पुणे, 25 ऑक्टोबर : दिवाळी सणाच्या दिवशी सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. लक्ष्मीपूजनानंतर आसमंत उजाळून निघाले होते. फटाके फोडून सर्वांनी आनंद साजरा केला. पण, याचदरम्यान पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील नर्हे भागातील ही घटना घडली. पुण्यातील एका मुलासोबत फटाका फोडतानाच्या दरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला. फटाका अचानक फुटल्यामुळे या मुलाचा चेहरा भाजल्याने त्याला गंभीर दुखापत झाली आहे. शिवांश अमोल दळवी मुलाचे नाव आहे. काल रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, जखमी मुलाची प्रकृती आता ठिक आहे. पण इतर मुलांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जखमी मुलाच्या नातेवाईकांकडून करण्यात आले आहे.
फटाके फोडताना काळजी घ्या, चिमुरड्यांना फटाके फोडू देऊ नका अन्यथा सोबत थांबा! पुण्यातला व्हिडीओ pic.twitter.com/LjuVvYilxF
— News18Lokmat (@News18lokmat) October 25, 2022
नातेवाईकांनी काय म्हटलं - माझा पुतण्या काल पाऊस हा फटाका फोडताना, फटाका अचानक फुटला त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. बाकीच्या मुलांनी अशाप्रकारची गंभीर दुखापत होऊ नये, यासाठी फटाके फोडताना काळजी घ्यावी, असे आवाहन या मुलाच्या कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.
पुण्यात 17 आगीच्या घटना - दिव्यांच्या प्रकाशाने आसमंत काल उजाळून निघाले होते. पुण्यात मोठ्या जल्लोषात दिवाळी सण साजरा झाला. तरुण आणि आबाल वृ्द्धांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला. पण, फटाके फोडण्याच्या नादात आग लागल्याच्या घटना घडल्या आहे. एकट्या पुण्यात आग लागल्याच्या 17 घटना समोर आल्या आहेत. अग्निशमन दलाला वेगवेगळ्या भागातून आग लागल्याबद्दल 17 ठिकाणाहून माहिती आली. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कुठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तर यवतमाळमध्ये फटाक्यांमुळे तीन दुकाने जळून खाक झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव शहरातील क्रांती चौकात रात्री ही घटना घडली. फटाक्यांमुळे आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली. पण या आगीमध्ये किराणा शॉप, विमा कार्यालय आणि अन्य दुकान असे 3 दुकान जळून खाक झाली.