बारामती, 26 ऑक्टोबर : आगामी विधानसभा निवडणुका महाविकासआघाडीमध्ये लढवण्यासाठी उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आग्रही आहेत. तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी याबाबत भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तर आता राष्ट्रवादी काँग्रेसही मुख्यमंत्रीपदासाठी आशावादी आहे. भविष्यात अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास आनंद होईल, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.
'अजितदादांसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला तर त्याचा आनंद आहे. पक्षाला त्याचा मोठा फायदा होईल, पण जेव्हा आम्ही आघाडी म्हणून एकत्र येतो, तेव्हा आमचे वरिष्ठ त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतात. हा निर्णय आम्हा आमदारांना पाळावा लागतो, पण दादांसारखा धडाडीचा मुख्यमंत्री कधीही फायद्याचा ठरेल,' असं रोहित पवार म्हणाले आहेत.
महायुती मुंबई महापालिकेसाठी
भाजप, शिंदे गट आणि मनसेच्या युतीचे संकेत मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवून होत असेल, अशी शंका रोहित पवारांनी व्यक्त केली. दसरा मेळाव्याला कोणाकडे उत्स्फुर्तपणे लोक आले, हे राज्याने बघितले, त्यामुळे कोणी कोणाशी युती केली तरी या मेळाव्यावरून मुंबई महापालिका निवडणुकीत काय होईल, याचा अंदाज येत असल्याची प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली.
राणेंना आव्हान
निलेश राणे आणि नितेश राणे यांनी 2024 ला माझ्या मतदारसंघात यावं, इथल्या जनतेवर माझा विश्वास आहे. मी जिंकेल न जिंकेल हे राणे नव्हे तर जनता ठरवेल. काहींना हवेत बोलायची सवय आहे, 2024 ला इथे कोणीही येवू द्या, कोण जिंकतंय बघू, असं आव्हान रोहित पवारांनी दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, NCP, Sharad Pawar