पुणे, 7 ऑक्टोबर : भूक भागवण्यासाठी सोपा आणि चटपटीत उपाय म्हणजे चिवडा. दीर्घकाळ टिकणारे चिवड्याचे प्रकार हे प्रत्येक घरोघरी असतात.
दिवाळी
मध्ये तर चिवड्याला विशेष महत्त्व आहे. लाडू, चकली, करंजी या सर्व पदार्थांसोबतच चिवडा देखाल घरोघरी केला जातो. बदलत्या लाईफ स्टाईलमध्ये सर्वांना दिवाळीचे पदार्थ घरी करता येतीलच असे नाही. त्यामुळे अनेक जण चिवडा खरेदी करतात. महाराष्ट्रातील घरोघरी पोहचलेल्या लक्ष्मीनारायण चिवड्याचा इतिहास आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत. हातगाड्यावर सुरूवात पुण्यातील लक्ष्मीनारायण चिवड्यानं गेल्या 77 वर्षांपासून आपली परंपरा जपली आहे. पुणे आणि आणि महाराष्ट्रासह जगभर लोकप्रिय असलेल्या लक्ष्मीनारायण चिवड्याची सुरूवात एका हातगाडीवर झाली. लक्ष्मीनारायण डेटा यांनी पुण्यामध्ये हा चिवडा विक्री सुरुवात केली होती त्याचा इतिहास फारच रंजक आहे. लक्ष्मीनारायण हे हरियाणा येथील रेवाडी गावातील रहिवासी होते. रेवाडीमध्ये त्यांची हातगाडी होती. इंग्रजांसोबत वाद झाल्यानंतर त्यांनी रेवाडी गाव सोडले आणि ते भूमिगत झाले. त्यानंतर त्यांनी म्यानमार, अफगाणिस्तान या देशांची भ्रमंती केली आणि ते अखेरीस पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात आल्यावर त्यांनी पुन्हा एकदा हातगाडी सुरू केली. वेगवेगळ्या राज्यात, देशांमध्ये फिरल्यामुळे त्यांना चवीची माहिती झाली होती. या भ्रमंतीमध्ये मिळालेल्या सर्व अनुभवाचा वापर करून त्यांनी लक्ष्मीनारायण चिवडा सुरू केला.
उपवासासाठी ‘या’ पद्धतीनं बनवा केळीची कुरकुरीत भजी, खाताच सर्व थकवा होईल दूर! Video
डेटा यांनी सुरूवातीला हातगाड्यावर चिवडा विकण्यास सुरूवात केली. 1945 साली त्यांना मिळालेले तत्कालीन कॅन्टोन्मेंट बोर्डाचे लायसन आजही दुकानात पाहयला मिळते. ‘सुरूवातीच्या काळात अगदी शेर आणि आण्यामध्ये हा चिवडा मिळत असे, अशी माहिती लक्ष्मीनारायण चिवड्याचे सध्याचे मालक प्रशांत डेटा यांनी दिली आहे. 77 वर्षांपासून चव कायम लक्ष्मीनारायण चिवड्याची गेल्या 77 वर्षांपासूनची चव कायम आहे, अशी भावना त्याच्या ग्राहकांमध्ये आहे. पुण्यातील भवानी पेठमधील मुख्य दुकानात वेगवेगळे व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक चिवडा खरेदीसाठी येत असतात. सुरूवातीच्या काळात चिवडा हा चैनीचा पदार्थ होता. घरातील लहान मुलांसाठी हा चिवडा घेऊन जाण्यासाठी ग्राहक येत असतं. हा चिवडा तीन वर्षांच्या मुलांपासून पुढील सर्व वयोगाटीत लोकं खाऊ शकतात.
न बोलताच मिळेल ऑर्डर! पुण्यातील ‘या’ हॉटेलमध्ये चालते सांकेतिक भाषा, VIDEO
लक्ष्मीनारायण यांची चौथी पिढी सध्या या व्यवसायात आहे. ‘आम्ही दिवसाला सात टन चिवड्याची निर्मिती करतो. दिवाळी आणि इतर सणांच्या दिवशी चिवड्याला मोठी मागणी असते. आमच्याकडील दगडी चिवडा 77 वर्षांपासून प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षापासून आम्ही बटाट्याचा चिवडा, मक्याचा चिवडा, खास बदामाचा चिवडा असे वेगवेगळे चिवड्याचे प्रकार सुरू केले आहेत. आमच्या चिवड्याला देश विदेशातून देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे. विमानतळावरही हा चिवडा विकला जातो. विदेशात स्थायिक झालेले पुणेकर शहरात आले की आवर्जून आमच्या चिवड्याची खरेदी करतात. पुण्याची ओळख म्हणून लक्ष्मीनारायण चिवड्याकडे पाहिले जाते, असे प्रशांत डेटा यांनी स्पष्ट केले.
गुगल मॅपवरून साभार
पत्ता लक्ष्मीनारायण चिवडा, भवानी पेठ पुणे