गणेश दुडम, प्रतिनिधी मावळ, 19 ऑक्टोबर : मुंबई पुणे एक्स्प्रेसवर शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे अवघ्या महाराष्ट्र हळहळला होता. आज पुन्हा एकदा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्या मावस भावाचा अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहयो मंत्री संदीपान भूमरेंच्या मावस भावाचा अपघातात मृत्यू झाला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हा अपघात झाला. अंबादास हरिश्चंद्र नरवणे असं त्यांचं नाव होतं. ते पाचोड चे रहिवाशी आहेत. नरवणे हे इनोव्हा गाडीतून मुंबईवरून पुण्याच्या दिशेने येत होते. (कोकणात राडा, भास्कर जाधवांच्या घरावर दगडफेक, पेट्रोलची बॉटलही फेकली) तेव्हा पहाटे कामशेतजवळ त्यांची इनोव्हा गाडी टेम्पोला पाठीमागून धडकली, नंतर इनोव्हा कारही मधल्या डिव्हाईडरवर आदळली. त्याचवेळी मागून आलेली चारचाकी आणि ट्रकने एकामागोमाग धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात इनोव्हाचा चुराडा झाला. यात नरवणे यांचा मृत्यू झाला. नरवणे यांच्यासोबत त्यांचे मित्र आणि चालक गाडीत होते. हे दोघे जखमी झाले. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ फाट्यानाजीक पाठीमागून येणाऱ्या कंटेनरची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात एका प्रौढाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात आज सकाळच्या सुमारास खेड येथील वेरळ येथे झाला. या अपघातात खेड येथील संदेश सुरेश बुटाला यांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. ( राष्ट्रवादी खासदारांच्या घरातच चोरी; कुलूप तोडून भांडी पळवली, औरंगाबामधील घटना ) अपघात घडल्यानंतर 108 रुग्णवाहिकेचे चालक बावा चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, दुचाकीला धडक देऊन पळ काढणाऱ्या कंटेनर चालकाला लोटे एमयडीसीच्या आसपास पकडण्यात आल्याची माहिती उपलब्ध होत असून खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.