मुंबई, 25 जुलै, तुषार रुपनवार: मुंबई पोलीस दलात कंत्राटी स्वरुपात पोलीस भरती होणार असल्याची बातमी समोर आली होती. या बातमीनंतर चर्चेला उधाण आलं. मात्र पोलीस दलामध्ये कोणत्याही प्रकारची कंत्राटी भरती होणार नसल्याचं आता समोर आलं आहे. गृहमंत्रालयाच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. कंत्राटी पद्धतीनं भरतीच्या बातम्या चुकीच्या असल्याचं देखील सूत्रांनी म्हटलं आहे. मुंबई पोलीस दलात कंत्राटी पद्धतीनं भरती असे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आले होते, मात्र हे वृत्त चुकीचे आहे. पोलीस भरतीमध्ये कुठल्याही परिस्थितीत कंत्राटी स्वरुपाची भरती होत नाही, होणार नाही, अशी माहिती गृहविभागातील उच्चपदस्थ सूत्रांकडून देण्यात आली आहे. गेल्या काळात पोलीस भरती न झाल्यानं तसेच मागील पोलीस आयुक्तांच्या काळात सुमारे 4500 पोलिसांच्या इतर ठिकाणी बदल्या झाल्यामुळे, मुंबई पोलीस दलामध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. पोलीस शिपयांची सुमारे दहा हजार पदं रिक्त आहेत. ही रिक्त पदं भरण्यास मंजुरी देखील देण्यात आली आहे, मात्र त्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी कालावधी लागतो. त्यामुळे पोलीस भरतीद्वारे नियमित पोलीस सेवेत दाखल होईपर्यंत मुंबईची कायदा -सुव्यवस्था वाऱ्यात सोडता येत नसल्यानं मुंबई पोलीस दलानं शासनाच्याच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून सुमारे 3000 मनुष्यबळ तुर्तास घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी देखील माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







