अलिबाग, 17 मे : अलिबागमध्ये (Alibag) फिरण्याच्या उद्देशातून आलेल्या एका जोडप्याने आपल्या मुला-मुलीला विष देवून हत्या केली आणि त्याननंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या (parents commit suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिबाग शहरातील ए बी कॉटेजमध्ये हा प्रकार घडला आहे. मयत जोडपे हे दोघेही पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील रहिवासी होते. हे जोडपे 11 मे पासून अलिबागमध्ये मुलगा आणि मुलीसह वास्तव्यास होते. मंगळवारी रूममध्ये गेल्यानंतर सकाळपासून दरवाजा उघडत नसल्याने तसेच काहीच हालचाल दिसून येत नव्हती. त्यामुळे कॉटेजमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना संशय आला. त्यानंतर दुपारी 3 च्या सुमारास कॉटेज मालकाने दरवाजा उघडला असता मुलांचे मृतदेह बेडवर आढळून आले. तर दोघांनी गळफास लावलेला दिसून आला.
(सायकल चालवताना लागला आईला धक्का, अभिनेत्रीने 9 वर्षाच्या मुलावर केला गुन्हा दाखल)
या प्रकरणी माहिती लगेच अलिबाग पोलिसांना कळवण्यात आली. घटनेतची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात नेले असून त्यांच्या कुटुंबीयांना कळविण्यात आले आहे. दरम्यान, यातील मृत महिला हरविल्याची फिर्याद तिच्या पतीने 1 मे रोजी शिक्रापूर पोलीस ठाण्यात नोंदविली होती अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
सावकाराच्या जाचास कंटाळून 21 वर्षीय विद्यार्थी तरुणाची आत्महत्या
दरम्यान, खाजगी सावकारांकडून घेतलेले पैसे अव्वाच्या सव्वा व्याजासह देऊनही कुटुंबीयांना सावकाराकडून दिला जाणारा त्रास असाह्य झाल्याने, अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या 21 वर्षीय विद्यार्थी तरुणाने गळफास घेऊन स्वतः जीवन संपवलंय. "मी हे सहन करू शकत नाही, मला माफ करा". असा व्हॉट्सअॅप मेसेज कुटुंबीयांना करत त्याने आत्महत्या केली. तर याप्रकरणी दोन आठवड्यानंतर बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये, 5 सावकारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला, अन् परतलाच नाही; सतीश चौधरीचा भयावह अंत)
पंकज बबन काळे वय 21 रा. जिजामाता चौक बीड, असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. मयत पंकजचे वडील बबन काळे हे माजलगाव पंचायत समितीत विस्ताराधिकारी आहेत. त्यांनी 2019 मध्ये दहा रुपये शेकडा दराने, किशोर बाजीराव पिंगळे या सावकाराकडून सात लाख रुपये घेतले होते. त्याबदल्यात गेवराई तालुक्यातील रोहितळ येथील 60 एकर जमीन आणि बीड शहरातील पत्नीच्या नावे असणारे राहते घर सावकार पिंगळे याने लिहून नोटरी करून घेतलं होतं. त्यानंतर व्याजासह मुळ रक्कम पिंगळे यास देऊनही, सावकार पिंगळे याने बबन काळे यांच्या पत्नीवर धनादेश न वटल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर 1 मे रोजी विस्ताराधिकारी असणारे, बबन काळे हे माजलगावला ध्वजारोहणासाठी गेले होते. त्या दिवशी कुटुंबातील व्यक्ती देखील बाहेर होते, मात्र मयत पंकज हा एकटाच घरी होता. सावकाराकडून घरी येऊन सततची धमकी, मारहाण याला वैतागून शेवटी पंकजने कुटुंबीयांना व्हॉट्सअॅप द्वारे मेसेज करून, घरातच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.