नागपूर, 8 ऑगस्ट: कोझिकोड येथील भीषण विमान दुर्घटनेत वैमानिक आणि विंग कमांडर दीपक वसंत साठे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे आई-वडील नागपूर येथे राहतात. दीपक साठे यांची आई लीलाबाई साठे यांचा आज (शनिवार) 83 वा वाढदिवस आहे. आईच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच मुलाच्या निधनाचं वृत्त समजल्यानं एका बाजूला वाढदिवसाचा आनंद तर दुसऱ्या बाजूला मुलगा जाण्याच्या दुः खाची किनार देखील आहे. माझ्या मुलानं स्व:ताच्या जीवाची बाजी लावून इतक्या लोकांचे प्राण वाचवले, याचा मला अभिमान असल्याचं लीलाबाई यांनी सांगितलं.
हेही वाचा...वैमानिक दीपक साठेंनी जीवाची बाजी लावून वाचवले प्रवाशांचे प्राण, भावानं FB वर व्यक्त केल्या भावना
दीपक यांचे वडील वसंत साठे हे देखील सैन्यात कर्नल पदावर होते तर मोठा भाऊ देखील लष्करात अधिकारी होता. त्यामुळे देश सेवेसाठी वाहून घेतलेल्या साठे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विंग कमांडर दीपक साठे यांच्या जाण्याने देशाचं नुकसान तर झालाच आहे पण साठे परिवारातील वृद्ध आई-वडिलांचा आधार देखील गेला आहे, असं दीपक साठे यांचे चुलत भाऊ सुनील साठे यांनी सांगितलं.
कॅप्टन दीपक वसंत साठे हे माजी वायुसेना पायलट होते. त्यांना अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनीही गौरवण्यात आले होते. एअर फोर्समधले एक कुशल लढाऊ पायलट असा त्यांचा लौकिक होता.
केरळमध्ये शुक्रवारी झालेल्या भीषण विमान अपघातातील मृतांचा आकडा 18 वर पोहोचला आहे. मृतांमध्ये अनुभवी वैमानिक दीपक साठे यांचा समावेश आहे. दीपक साठे आणि त्यांचे सहकारी अखिलेश कुमार यांना जीवाची बाजी लावून अनेक प्रवाशांचे प्राण वाचवल्याची माहिती समोर आली आहे.
आपला प्रदीर्घ अनुभव पणाला लावून दीपक साठे आणि अखिलेश कुमार यांनी प्रसंगावधान राखूव कमीत कमी जिवीतहानी होईल, याची खबरदारी घेतली होती, मात्र अखेर या प्रयत्नात दोघांचा मृत्यू झाला, असं दीपक साठे यांचे चुलत बंधू निलेश साठे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
निलेश साठे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, दुबईहून केरळमध्ये आलेल्या विमानाचे लँडिंग गिअर काम करत नव्हते. हिंदूस्थानच्या हवाई दलाचे माजी वैमानिक दीपक साठे विमानतळाभोवती तीन फेऱ्या मारत विमानातील इंधन संपवलं होतं. यामुळे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर विमानाला आग लागणार नाही. यामुळे विमान दुर्घटनेनंतर धुराचे लोळ उठलेले दिसले नाहीत. विमान लँड करण्याच्या आधीत दीपक साठे यांनी इंजिन बंद केलं होतं. विमान धावपट्टीवर तीनदा आदळल्यानंतर विमानाच्या मध्यभाग जमिनीला टेकला होता. विमानाचा उजवा पंख क्षतिग्रस्त झाला होता.
पुढे निलेश साठे म्हणाले की, परदेशात अडकलेल्या हिंदुस्थानींना मायदेशात परत आणत असल्याच दीपक साठे यांनी सार्थ अभिमान होता. दीपक यांच्यासोबत झालेल्या अखेरच्या संभाषणाचाही निलेश यांनी आपल्या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे. संबंधित देशामध्ये विमान जात असताना ते रिकामं जात असतं का? या माझ्या प्रश्नावर दीपक म्हणाले होते, नाही, विमान कधीच रिकामं जात नाही. त्यात भाज्या, फळं आणि औषधे लादून नेली जातात, असं त्यांनी सांगितलं होतं.'
हेही वाचा...निष्णात पायलट होते कॅप्टन साठे, 22 वर्षांच्या अनुभवाआधी Airforce मध्येही सेवानेमका कस झाला अपघात...
'वंदे भारत मिशन' अंतर्गत दुबईहून केरळला आलेल्या एअर इंडियाच्या IX 1344 विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला असून 123 जण जखमी आहेत. कोझिकोड विमानतळ हे टेबल टॉप एअरपोर्ट आहे. त्यामुळे इथे विमान उतरत असताना धावपट्टीवर खूपच काळजीपूर्वक उतरवावं लागतं. त्यातच शुक्रवारी मुसळधार पावसामुळे रनवेवर पाणी होतं आणि पावसाचा जोर वाढल्यानं धुसर दिसत होतं. विमान धावपट्टीवरून घसरून ते 35 फूट खोल खाली कोसळलं. विमानाचे दोन तुकडे झाले. या विमानात 170 प्रवासी होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.