...मनावर दगड ठेवून निर्णय घ्यावा लागला, पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट!

...मनावर दगड ठेवून निर्णय घ्यावा लागला, पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट!

'मी खूप व्यथित आहे. पण तरीही मी प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार आहे, आपणही सहकार्य करावे आणि कोणीही आपापल्या घरातून बाहेर पडू नये'

  • Share this:

बीड, 01 जून : भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा 3 जून रोजी 6 वा पुण्यस्मरण कार्यक्रम परळी येथे आयोजित करण्यात आला होता. परंतु, कोरोनाचा परिस्थितीत लोकांची गर्दी जमू नये म्हणून हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली. या कार्यक्रमाला आपण हजर राहू शकणार नाही, त्यामुळे मुंबईतील घरीच राहून पुण्यस्मरण सोहळा साजरा करणार, अशी माहितीही पंकजा मुंडेंनी दिली.

पंकजा मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट करून सर्व कार्यकर्ते आणि समर्थकांना भावनिक आवाहन केलं आहे. बीड जिल्हाधिकारी यांचे  एक पत्र प्राप्त झाले. गेले दोन-तीन दिवस कोरोना आणि 3 जूनच्या कार्यक्रमा संदर्भात त्यांच्याशी चर्चा होत होती. लॉकडाऊनच्या काळात मुंबई ते बीड या प्रवासात काय परिस्थिती निर्माण होईल याचा अंदाज प्रशासकीय पातळीवर घेतला जात होता. मला 1 जूनला प्रवासाची परवानगी मिळाली पण लॉकडाउन होण्याच्या निर्णयानंतर आणि मधल्या काळात झालेल्या बदलानंतर सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी मला विनंती केलेली आहे की, माझा 3 जूनच्या कार्यक्रमांसाठी आखलेला बीड-परळीचा प्रवास रद्द करावा, त्यांच्या विनंतीला मान देऊन मी माझा परळीचा दौरा रद्द केला आहे, अशी माहिती पंकजांनी दिली.

तसंच, 'मी एक जबाबदार नागरिक, मंत्री राहिलेली आहे आणि मी प्रशासनाच्या अडचणी समजू शकते, हा विचार करून तसंच लोकांची काळजी म्हणून 3 जून मुंडे साहेबांचे पुण्यस्मरण घरात राहूनच करेन. माझी बहीण खासदार प्रीतम ताई या परळी येथेच आहेत, त्यादिवशी त्या गोपीनाथ गडावर जातील आणि दर्शन व माझा कार्यक्रम असे दोन्ही ऑनलाईन Live करतील' असंही पंकजांनी स्पष्ट केलं.

त्याचबरोबर, जे मला फोन करत आहेत ताई, तुम्ही कधी निघताय, कधी निघताय.. पनवेल, नवी मुंबई, पुणे, शिक्रापूर, नगर, जामखेड, पाथर्डी, आष्टी, पाटोदा, शिरूर, बीड सगळीकडचे लोकं आम्ही निघतोय असे म्हणत आहेत. त्या सर्वांना माझी विनंती आहे की, आपण सर्वांनी मी जशी आपल्याला सूचना केली आहे. त्याप्रमाणे घरात राहूनच मुंडे साहेबांची पुण्यतिथी साजरी करावी. आपण सर्व त्याच वेळेमध्ये कार्यक्रम करूया आणि मुंडे साहेबांना समर्पित असा तो दिवस पार पाडूया' असं आवाहनही पंकजा मुंडेंनी सर्व समर्थक आणि कार्यकर्त्यांना केलं.

हेही वाचा- आदित्य ठाकरेंनी दिली मुंबईतील 'या' परिसराबद्दल Good News

'एखादा अनुचित प्रकार झाला असता किंवा दुसऱ्या एखाद्या करण्यासाठी संचारबंदी लागली असती तर त्याची पर्वा मी केली नसती पण इथे लोकांचा जीव आणि त्यांचे आरोग्य धोक्यात येईल म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागत आहे, अगदी मनावर दगड ठेवून.. गोपीनात मुंडे यांचं दर्शन मी तीन जूनला घेऊ शकत नाही हे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी अतिशय अवघड आहे. मी खूप व्यथित आहे. पण तरीही मी प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार आहे, आपणही सहकार्य करावे आणि कोणीही आपापल्या घरातून बाहेर पडू नये आणि माझ्या पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी' असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात.

संपादन - सचिन साळवे

First published: June 1, 2020, 11:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading