मुंबई, 09 जुलै: खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्यानं भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या. दरम्यान आज पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाही. चुकीच्या बातम्या पेरल्या गेल्या असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
पंकजा मुंडे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
मंत्रिपदासाठी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ते योग्यच होतं. भाजपमध्ये फक्त प्रीतमताईंचंच नव्हे तर हीना गावितांचंही नाव चर्चेत होतं. पण पक्ष विचार करुनच निर्णय घेतो.
केवळ मुंडे साहेबांची कन्या म्हणून नव्हे तर त्यांचं काम चांगलं आहे. त्यांनी पक्षासाठी खूप काम केलं आहे. पण नवीन लोकांना संधी द्यायला हरकत नाही.
प्रीतम मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर राजकारणात आल्या. पहिली टर्म त्या साहेबांच्या कामांमुळे, भावनेमुळे लोकांनी निवडून दिलं. पण दुसरी टर्म त्या त्यांच्या स्वतःच्या विकास कामावर निवडून आल्या.
हेही वाचा- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक
आम्ही नाराज असण्याचा प्रश्नच नाही. महाराष्ट्र किंवा दिल्लीत कोणतंही पद द्यायचं असेल तर मुंडे कुटुंबाचं नाव चालतं. त्यामुळे आमचं नाव चाललं. पण आमच्या नाराजीचा प्रश्नच नाही. कारण आम्ही कोणतीही मागणी केली नव्हती.
टीम देवेंद्र वगैरे असं आमच्याकडे नाही, मी मी असं चालत नाही. मला टीम नरेंद्रमध्ये कोण आहे, टीम देवेंद्रमध्ये कोण आहे, याबाबत माहिती नाही. भाजपला टीम नरेंद्र, टीम देवेंद्र मान्य नाही.
मीपणा पक्षाला मान्य नाही, आमच्या संस्कृतीला, मी-मी असं मान्य नाही. आमच्या पक्षात आम्ही-आपण असं मानतो, त्यामुळे टीम देवेंद्र आमच्या पक्षाला मान्य नाही. पक्षनिष्ठा माझ्या बापाने संस्कारात दिली आहे. पक्ष हे आमच्यासाठी नातं आहे, आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, त्यांची संस्कृती काढणं माझ्या संस्कृतीत बसत नाही.
नवीन चेहरे आले, त्यामुळे पक्षाची ताकद वाढणार, असं पक्षाच्या श्रेष्ठींना वाटत असेल, तर माझा त्यावर विश्वास आहे. पक्षाची ताकद वाढली, तर हा निर्णय योग्य ठरेल.
मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या सर्वांचं अभिनंदन. मी स्वत: अनेकांचं फोन करुन अभिनंदन केलं आहे.
हेही वाचा- ''संजय राऊतजी, आम्हालाही आरेला कारे करता येते'', भाजपचा इशारा
भारती पवार, कपिल पाटील यांच्याशी मी बोलले. डॉ. भागवत कराड यांचा मला फोन आला होता. त्यावेळी मला त्यांच्याबद्दल कळलं. मी त्यांनाही शुभेच्छा दिल्या.
राजकारणात मी व्यवसाय म्हणून नव्हे तर व्रत म्हणून आले. लोकांचं असलेलं नातं कधी तुटत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Pankaja munde