मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : चेंदा-मेंदा झालेली कार, रस्त्यावर सायरस मिस्त्रींचा मृतदेह; पोलिसांनी सांगितलं अपघातामागील नेमकं सत्य

Video : चेंदा-मेंदा झालेली कार, रस्त्यावर सायरस मिस्त्रींचा मृतदेह; पोलिसांनी सांगितलं अपघातामागील नेमकं सत्य

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Chetan Patil

पालघर, 4 सप्टेंबर : भारताच्या सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेले आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झालं आहे. मिस्त्री यांच्या मर्सिडीज कारचा अहमदाबाद-मुंबई हायवेवर भीषण अपघात झाला. या अपघातात सायरस मिस्त्री आणि कारमधील आणखी एका जणाचा मृत्यू झाला आहे. अतिशय भीषण असा हा अपघात होता. अपघातग्रस्त मर्सिडीज कारमध्ये चार जण होते. यापैकी मिस्त्री आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमी झालेल्या दोघांवर गुजरातमधील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे देशाच्या उद्योग जगताला मोठा हादरा बसला आहे. याशिवाय देशाची खूप मोठी हानी झाली आहे. मिस्त्री यांच्या अपघातानंतरचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोत मिस्त्री यांचा गाडीबाहेर मृतदेह पडलेला दिसतोय. अतिशय मन पिळवटून टाकणारे ते फोटो आहेत. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे.

"सव्वा तीन वाजेच्या दरम्यान अहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या हायवेवर हा अपघात घडला. पालघर जिल्ह्यात अहमदाबाद-मुंबई हायवेवर कासा या पोलीस ठाण्याजवळ सूर्या नदीचा पूल आहे. सूर्या नदीवर एक नवा ब्रिज आणि जुना ब्रिज असे दोन ब्रिज आहेत. ज्या ठिकाणी नवीन ब्रिज सुरु होतो त्याठिकाणी डिव्हायडर आहे, त्या डिव्हायडरच्या डाव्या बाजूला जावून मिस्त्री यांची मर्सिडीज कार धडकली आहे. त्यामुळेच हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त मर्सिडीज कारमध्ये चारजण सवार होते. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दोन जण जखमी आहेत. जखमींना गुजरातच्या वापीतील रेन्बो हॉस्पिटल येथे दाखल केलं आहे. तर मृतक हे कासाच्या जिल्हा उपरुग्णालयात आहेत", अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

(सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर आणखी एक मन पिळवटून टाकणारी मोठी बातमी समोर)

या अपघाताचे जे फोटो समोर आले आहेत ते अंगावर काटा आणणारे असेच आहेत. या फोटोंमध्ये मिस्त्री आणि त्यांच्यासोबत असलेले गाडीतील प्रवासी अपघातग्रस्त गाडीच्या बाजुला जमिनीवर पडले आहेत. या फोटोंमध्ये अपघातग्रस्त गाडीची अवस्था देखील दिसत आहे. अपघातात गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला दिसत आहे. गाडीचे एअरबॅग्स बाहेर निघालेले दिसत आहेत. या फोटोंवरुन अपघात किती भयानक घडला असेल यांचा अंदाज लावता येईल.

अपघातग्रस्त गाडीत कोणकोण होतं?

सायरस मिस्त्री त्यांच्या महागड्या मर्सिडीज कारने प्रवास करत होते. कारमध्ये ड्रायव्हरसह तीन जण असे एकूण चार जण होते. यामध्ये स्वत: सायरस मिस्त्री, जहांगीर दिनशा पंडोले, अनायता पंडोले (महिला), दरीयस पांडोले यांचा समावेश होता. अपघातात सायसर मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर इतर तीनही जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण जखमींपैकी एक असलेल्या जहांगीर दिनशा पंडोल यांचादेखील उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं वृत्त समोर येत आहे.

सायरस मिस्त्री यांच्याविषयी माहिती

सायरस मिस्त्री हे व्यावसायिक जगतात सामान्य नाव नाही. ते प्रसिद्ध भारतीय वंशाचे खरबापती पलोनजी शापूरजी मिस्त्री यांचे धाकटे पुत्र आहेत. सायरस मिस्त्री यांचा जन्म 4 जुलै 1968 रोजी मुंबईत झाला. 1992 मध्ये सायरस मिस्त्री यांनी भारतातील आघाडीच्या वकीलांपैकी एक असलेल्या इक्बाल छागला यांची मुलगी रोहिका छागला हिच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुलगे आहेत.

सायरस मिस्त्री यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण मुंबईतील कॅथेड्रल आणि एंड जॉन कॉनन स्कूलमधून केले. त्यानंतर ते सिव्हिल इंजिनीअरिंगसाठी लंडनला गेले. त्यांनी लंडन बिझनेस स्कूलमधून (व्यवस्थापन) पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्याच्याकडेही वडिलांप्रमाणे आयरिश नागरिकत्व आहे.

सायरस मिस्त्री यांनी 1991 मध्ये त्यांच्या वडिलांच्या व्यवसाय पालोनजी शापूरजी ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 1994 मध्ये शापूरजी पालोनजी ग्रुपचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आपल्या वडिलांप्रमाणे, सायरस मिस्त्री यांनी भारतात अनेक मोठे विक्रम प्रस्थापित केले, ज्यात सर्वात उंच निवासी टॉवर बांधणे, सर्वात लांब रेल्वे पूल बांधणे आणि सर्वात मोठे बंदर बांधणे. पालोनजी मिस्त्री ग्रुपचा व्यवसाय कापडापासून रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस ऑटोमेशनपर्यंत पसरलेला आहे.

First published:

Tags: Accident, Palghar