मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /तिसऱ्या लाटेची चिन्हं? राज्यात कोरोनाबाधित बालकांच्या संख्येत महिन्याभरात मोठी वाढ

तिसऱ्या लाटेची चिन्हं? राज्यात कोरोनाबाधित बालकांच्या संख्येत महिन्याभरात मोठी वाढ

राज्यात कोरोनाबाधित (Corona Cases in Maharashtra) झालेल्या लहान मुलांच्या संख्येत महिन्याभरात तब्बल 4 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

मुंबई 09 सप्टेंबर : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (2nd Wave of Coronavirus in India) अक्षरशः हाहाकार माजवला होता. मात्र, आता ही लाट आटोक्यात आलेली आहे. अशात आता नुकतंच समोर आलेल्या आकडेवारीनं मात्र पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. राज्यात कोरोनाबाधित (Corona Cases in Maharashtra) झालेल्या लहान मुलांच्या संख्येत महिन्याभरात तब्बल 4 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या काळात 11 वर्षावरील 18 हजार 413 बालकांचा कोरोनाची लागण झाली आहे.

जुलै महिन्यापर्यंत राज्यात 10 वर्षाखालील 2 लाख बालकांना तर 11 वर्षावरील 4 लाख 63 हजार मुलांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच यात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. 6 सप्टेंबरला समोर आलेल्या आकडेवारीनुसार, 10 वर्षाखालील 6 हजार 738 बालकांना नव्यानं कोरोनाची लागण झाली. यामुळे बालकांच्या बाधित होण्याच्या प्रमाणात 3.36 टक्क्यांची वाढ झाली. तर, 11 वर्षांवरील बालकांमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचं आढळून आलं. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात 11 वर्षावरील 18 हजार 413 मुलं कोरोनाबाधित झाल्याचं आढळून आलं. या वयोगटातील बाधित मुलांच्या संख्येत चार टक्क्यांनी वाढ झाली आहे.

महापौर किशोरी पेडणेकरांचं मुंबईतल्या तिसऱ्या लाटेबद्दल महत्त्वाचं विधान

राज्यातील परिस्थितीचा विचाप केल्यास महाराष्ट्रात आतापर्यंत 20 वर्षाखालील 6 लाख 88 हजार 218 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 25 हजार 151 मुलं गेल्या महिनाभरात नव्यानं बाधित झाले. महाराष्ट्रात 11 ते 20 या वयोगटातील मुलांची संख्या सुमारे 2 कोटी 16 लाख इतकी आहे. आतापर्यंत यातील 4 लाख 81 हजार 462 मुलांना कोरोनाची लागण होऊन गेलेली आहे. या वयोगटातील एकूण कोरोनोबाधितांचं प्रमाण हे 2.23 टक्के इतकं आहे. हेच प्रमाण दहा वर्षांखालील बालकांच्या बाबतीत 3.18 टक्के तर 11 वर्षावरील मुलांच्या बाबतीत 7.42 टक्के इतकं आहे. राज्यात आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण रुग्णसंख्येत 10 टक्के बालकांचा समावेश आहे.

Corona Update: भारतात पुन्हा एकदा रेकॉर्डब्रेक लसीकरण, 24 तासांत नवा विक्रम

सरकारनं 18 वर्षावरील सर्वांना लस (Corona Vaccine) देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, बालकांसाठीची लस अद्याप उपलब्ध झालेली नाही. अशात लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे, अशा परिस्थितीत लहान मुलांची काळजी घेणं अधिक गरजेचं आहे. सोबतच सणासुदीच्या काळात रुग्णसंख्येत मोठी वाढ होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी योग्य खबरदारी घेणं गरजेचं आहे, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus