नवी दिल्ली, 7 सप्टेंबर : भारतात लसीकरणाचा (
vaccination) वेग वाढत चालला असून देशाने गेल्या 24 तासांत पुन्हा एकदा विक्रमी लसीकरणाची (
Record break dose) नोंद केली आहे. केंद्र सरकारनं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 1 कोटी 30 लाखांपेक्षाही अधिक लसी दिल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून मंदावलेल्या लसीकरणाला वेग यायला सुरुवात झाल्याचं हे लक्षण असून हाच वेग कायम राहिला, तर लवकरात लवकर देशवासियांचं लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
1 कोटींपेक्षा अधिक लसीकरण
एका दिवसात एक कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लसी देण्याचा विक्रम भारताने नोंदवण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी तीन वेळा एका दिवसात 1 कोटींपेक्षा अधिक लसी देण्याचा विक्रम भारताने नोंदवला होता. 27 ऑगस्टला भारतात पहिल्यांदा एका दिवसांत 1 कोटींपेक्षा अधिक लसी देण्यात आल्या होत्या. त्यानंतर 31 ऑगस्टलादेखील 1 कोटींपेक्षा अधिक लसीकरणाची नोंद झाली होती. त्यानंतर 6 सप्टेंबरला आणि 7 सप्टेंबरला 1 कोटींपेक्षा अधिक लसीकरण झालं आहे.
हे वाचा -
इतक्या वेगाने का पसरतोय Delta variant? संशोधकांना सापडलं मुख्य कारण
तिसऱ्या लाटेचा इशारा
भारतात सध्या केरळ आणि महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झाल्याचं चित्र आहे. या पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधानांनी चर्चा केली असून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. तर भारतात तिसरी लाट सुरू झाली असल्याचा इशाराही काही शास्त्रज्ञांनी दिला आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असणे, हे नव्या लाटेचं लक्षण मानलं जातं. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांमध्ये रुग्णसंख्या आणि मृत्यूंचा आकडाही वाढत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे सध्या तिसरी लाट सुरू झाल्याचं मानलं जात आहे. मात्र लसीकरणाचा वेग असाच कायम राहिला, तर मात्र तिसऱ्या लाटेला आटोक्यात ठेवणं देशाला शक्य होणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.