मुंबई, 12 जून: प्रख्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यादोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हा प्रश्न सर्वांना पडला. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात शुक्रवारी झालेल्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली. तसंच प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारसाहेबांना दिली, असं मलिकांनी सांगितलं. हेही वाचा- शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या बैठकीत ठरला मोठा प्लॅन, या मुद्यांवर झाली चर्चा! प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे जाऊन भेट घेतली. तब्बल 3 तासही बैठक सुरू होती. या बैठकीत देशासह राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्याची इच्छा पवारसाहेबांची आहे आणि ती त्यांनी बोलून दाखवली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते. मात्र तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. मात्र देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत. भाजपच्या विरोधात एक सशक्त मोर्चा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील असून येणाऱ्या काळात हा प्रयत्न केला जाईल अशी स्पष्ट भूमिका नवाब मलिक यांनी मांडली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.