शिवाजी गोरे (प्रतिनिधी), रत्नागिरी, 13 जून: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित समाजाला उभं करण्यासाठी झिजवलं. अनेक कुटुंबांना आधार दिला. आता ते हयात नसताना त्यांच्या स्मारकानं आम्हाला जीवदान दिलं, अशी भावना आंबडवे येथील गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. नुकत्याच येऊन गेलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव असलेल्या आंबडवे गावाला देखील बसला आहे. गावात बाबासाहेबांचं स्मारक नसतं तर आमचं जगणं अवघड झालं असतं, असंही आंबडवे येथील नागरिकांनी सांगितलं आहे.
हेही वाचा.. पोलिसांना कोरोनाचा विखळा! मुंबईत गेल्या 24 तासांत 4 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू
3 जून रोजी निसर्ग चक्रीवादळ आलं होतं. लोक सकाळपासूनच भयभीत झाले होते. मात्र, दहा वाजता अचानक सोसाट्याचा वारा सुटला. चक्रीवादळाला धुमश्चक्री सुरू झाली आणि आंबडवे गावात एकच हाहाकार उडाला. जीव मुठीत घेऊन सगळे सैरावैरा धावत होते. सगळ्यांच्या डोळ्यांसमोर दिसत होतं फक्त बाबासाहेबांचे स्मारक दिसत होतं. सगळे तिकडे पळत सुटले. त्या परिस्थितीत गावातलं बाबासाहेबांचे स्मारक गावकऱ्यांसाठी जीवनदायी ठरलं. गावातील अनेक कुटुंबांनी स्मारकात आसरा घेतला. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. विशेष म्हणजे बाबासाहेबांचे अनेक नातेवाईक आजही आंबडवे येथे राहतात. त्यांनी सुद्धा चक्रीवादळाच्या संकटात स्मारकाचा आधार घेतला होता.
मंडणगड तालुक्यात आंबडवे गाव आहे. याच गावात बाबासाहेबांचं स्मारक आहे. याच स्मारकामुळे या वादळात अनेकांचे जीव वाचले. वादळामुळे या गावातील जवळपास प्रत्येक घराचं नुकसान झालं आहे. कोणाच्या घराचं छत उडालं तर कोणाचं अख्ख घर उध्दवस्त झालं आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असलं तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली आहे. त्याचं मुख्य कारण हे वादळ सुरू व्हायच्या आधी अनेकांनी बाबासाहेबांच्या स्मारकात आश्रय घेतला.
वादळ आलं तेव्हा सात ते आठ जणांनी या स्मारकाचा दरवाजा घट्ट धरून ठेवला. त्यामुळे वादळ आत शिरल नाही. त्यामुळे स्मारकात असलेले सर्वजण सुरक्षित राहिले. काही राजकीय नेते तसेच पुढाऱ्यांनी या गावाला भेट दिली. मात्र तातडीची मदत काही या गावाला अद्याप मिळालेली नाही.
हेही वाचा.. बळीराजासोबत तिफन ओढताना संभाजीराजे झाले भावूक, VIDEO शेअर करुन व्यक्त केली भावना
निसर्ग चक्रीवादळाने गावांमध्ये प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. आंबा, काजू, नारळ, सुपारीच्या बागा उध्दवस्त झाल्या आहेत. हे नुकसान कधी न भरून निघणारं आहे. मात्र, बाबासाहेबांच्या स्मारकामुळे सुखरूप आहेत, याचा आनंद असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.