मुंबई, 13 जून: मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. त्यात पोलिस दलातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. कोरोनाशी लढणाऱ्या खाकी वर्दीतील आणखी 4 योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांत 4 पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
हेही वाचा...कोरोना संसर्गामुळे मृत्यू ओढावलेल्या व्यक्तीबाबत सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय
बोरिवली, वाकोला आणि दिंडोशी या पोलीस ठाण्यांमध्ये हे कर्मचारी तैनात होते. मुंबईत आतापर्यंत 26 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.
पोलिस कॉन्स्टेबल संदेश किणी (बोरिवली), हवालदार हेमंत कुंभार (दिंडोशी), हवालदार अनिल कांबळे (वाकोला) आणि एएसआय दीपक लोळे (संरक्षण विभाग) अशी मृत पोलिसांची नाव आहेत. दरम्यान, राज्यात मागील दोन दिवसात 129 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधित पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या 3388 एवढी झाली आहे. आतापर्यंत 1945 पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 40 पोलिसांचा कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाला आहे.
मुंबईत आढळली कोरोनाची नवी लक्षणे
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबई तर कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. सर्दी, ताप, खोकला, श्वास घेतांना त्रास होणे, अशक्तपणा ही कोरोनाची सर्वसाधारण लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळली तर तातडीने डॉक्टरांकडे जायचा सल्ला दिला जातो. नंतर तोंडाची चव जाणे आणि कुठलाही वास यायचा बंद होतो अशीही लक्षणे आढळली होती. आता मुंबईतल्या अनेक रुग्णांना गॅस्ट्रोसारखी लक्षणेही आढळून आल्याचं पुढे आलं आहे.
पावसाला सुरुवात झाली की दरवर्षी साथीचे आजारही डोके वर काढत असतात. सर्दी, खोकला, ताप, हे कॉमन आजार आहेत. त्यात गॅस्ट्रो आणि डेंग्युची साथही येत असते. अशा परिस्थितीत आता कोरोनाही आल्याने जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.
हेही वाचा...महाराष्ट्रात कमी पैशांमध्ये होणार ‘COVID-19’ची टेस्ट, जाणून घ्या!
कोरोना झालेल्या अनेक रुग्णांना पोट बिघडणं, थकवा येणं अशीही लक्षणं दिसून येत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे निष्काळजीपणा न करता अशी काही लक्षणे आढळली तर तातडीने डॉक्टरांना दाखवा असा सल्ला दिला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.