राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट, सेनेच्या भूमिकेमुळे शरद पवार भाजपसाठी 'गेमचेंजर'?

राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट, सेनेच्या भूमिकेमुळे शरद पवार भाजपसाठी 'गेमचेंजर'?

सत्तास्थापनेसाठी सध्या युतीकडून कोणतीही हालचाल नसली तरी भाजप-सेनेमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच असल्याचं दिसत आहे. यात शरद पवार यांची भूमिका भाजपसाठी महत्त्वाची ठरत आहे.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला तरी राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली दिसत नसल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उत आला आहे. सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपला बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. तसेच गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजप-सेनेच्या जागा कमी झाल्या. दुसरीकडे राष्ट्रवादीने अर्धशतक तर काँग्रेसनं 40 चा आकडा पार केला. या निवडणुकीत बंडखोरांनी प्रमुख पक्षांना मोठा दणका दिला.

आता सत्ता स्थापनेसाठी युतीमध्ये निवडणुकीच्या आधी निश्चित करण्यात आलेल्या 50-50 फॉर्म्युल्याचा पेच निर्माण झाला आहे. शिवसेना युतीच्या ठरलेल्या या फॉर्म्युल्यावरच सरकार स्थापन करायचे यावर ठाम आहे. तर दुसरीकडे भाजपने 15 ते 20 बंडखोर आमच्या संपर्कात आहेत असं म्हणून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भूमिकेचा भाजपला सत्ता स्थापनेत फायदाच होत आहे. सत्ता स्थापनेत आपल्याला रस नसल्याचं सांगितल्यानं राज्यात वेगळी राजकीय गणितं जुळण्याची शक्यता मावळली. त्यामुळे आता सेनेला भाजपसोबतच जावं लागणार आहे.

शिवसेनेसमोर पेच, भाजपशिवाय पर्याय नाही

निकालानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपण शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेचा विचार करत नसल्याचे स्पष्ट केलं. तसेच विरोधी पक्षात बसू असंही त्यांनी सांगितलं होतं. यामुळे शिवसेनेची पंचाईत झाली असून त्यांना भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याशिवाय पर्याय नाही. 2014 मध्ये राष्ट्रवादीने सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. राज्यात मध्यावधी लागू नयेत यासाठी ही भूमिका घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

वाचा : राष्ट्रवादीला धक्का, निकालानंतर नेत्याचा शिवसेनेत प्रवेश!

राज्यात भाजपने 105, शिवसेनेनं 56, राष्ट्रवादीने 54 तर काँग्रेसनं 44 जागी विजय मिळवला. अपक्ष, बंडखोरांसहीत इतर पक्षांतील उमेदवारांनी 28 जागा जिंकल्या आहेत. आता राष्ट्रवादीने सरकार स्थापनेसाठी कोणताच प्रयत्न करणार नाही अशी भूमिका घेतल्यानं शिवसेनेला भाजपसोबतच जावं लागेल. यात त्यांना पुन्हा तडजोड करावी लागू शकते. भाजपने त्यांच्या अटी मान्य न केल्यास सेनेसमोर दुसरा पर्याय शिल्लक नसेल.

सेना-भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांची घेतली स्वतंत्र भेट

राष्ट्रवादीने भूमिका जाहीर केल्यानंतर शिवसेना जास्त काळ भाजपला अडवू शकणार नाही. त्यातच फक्त काँग्रेसचे संख्याबळही शिवसेनेसाठी पुरेसे नाही. अशा परिस्थितीत सरकार स्थापनेत अद्यापही राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. 50-50 फॉर्म्युल्यानुसार अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवर आता युती सरकारचं घोडं अडण्याची शक्यता आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सेनेचे नेते दिवाकर रावते यांनी स्वतंत्रपणे राज्यपालांची भेट घेतल्यानं वेगळीच चर्चा रंगली आहे. ही भेट दिवाळीनिमित्त असली तरी सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्वाचं मानलं जात आहे.

50-50 फॉर्म्युला ठरवणार सरकारचे भविष्य

1999 मध्ये भाजपचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी 50-50 फॉर्म्युला मांडला होता. त्यावेळी सेनेने हा फॉर्म्युला नाकारला होता आणि युतीचं सरकार स्थापन करता आलं नव्हत. यावेळी सेनेकडून या फॉर्म्युल्याची मागणी होताना दिसत आहे तर भाजपकडून यावर अद्याप सकारात्मक प्रतिसाद आल्याचं दिसत नाही. राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे भाजपला एकप्रकारे दिलासाच मिळाला आहे.

काँग्रेसला फायदा होईल असं काही सेना करणार नाही

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरातील पत्रकार परिषदेत शिवसेना आपल्यासोबत असल्याचं वक्तव्य केलं. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे असा कोणताही निर्णय घेणार नाहीत ज्यामुळे काँग्रेसला फायदा होईल. याचाच अर्थ अजुनही युतीच्या 50-50 फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम राहणार की दुसरा काही निर्णय घेणार यावर युतीच्या सरकारचे भविष्य अवलंबून आहे. सध्या तरी आघाडीने विरोधी पक्षात राहणार असल्याचं स्पष्ट केल्यानं ही गोष्ट भाजपसाठी फायद्याची ठरत आहे.

सध्याचे संख्याबळ

सध्या भाजपचे 105, शिवसेनेचे 56, राष्ट्रवादीचे 54 तर काँग्रेसचे संख्याबळ 44 आहे. बंडखोर, अपक्ष आणि इतर पक्षातील आमदारांची संख्या 28 इतकी आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 145 आमदारांची आवश्यकता आहे. सेनेला भाजपसोबतच जावं लागणार आहे. याआधी आघाडीकडून राष्ट्रवादीला पाठिंबा दिला जाईल अशी चर्चा होती. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्ही शिवसेनेसोबत जाणार नाही असं स्पष्ट करत विरोधी पक्षातच राहणार असं म्हटलं होतं.

वाचा : कोल्हापूरच्या जनतेचा माझ्यावर विश्वास, ते वाक्य मी झोपेतही उच्चारू शकणार नाही : चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील पराभवाचं सांगितलं कारण, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2019 12:15 PM IST

ताज्या बातम्या